दिवसअखेर भारताच्या 4 बाद 317 धावा
By Admin | Updated: November 17, 2016 17:30 IST2016-11-17T17:30:43+5:302016-11-17T17:30:43+5:30
इंग्लंड विरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर अडचणीत सापडलेला भारताचा डाव कर्णधार विराट कोहली

दिवसअखेर भारताच्या 4 बाद 317 धावा
>ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. 17 - इंग्लंड विरुद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर अडचणीत सापडलेला भारताचा डाव कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी सावरला. भारताने पहिल्या डावात दिवसअखेर 4 बाद 317 धावा केल्या.
सुरुवातीला या सामन्यात भारताची दोन बाद 22 धावा अशी केविलवाणी अवस्था झाली होती. मात्र, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी केलेल्या 226 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताला सावरले. पुजारा आणि कोहली दोघांनी १३० पेक्षा जास्त धावांची भागीदारी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. चेतेश्वर पुजाराने 119 धावा केल्या.तर नाबाद विराट कोहलीने 151 धावा केल्या आहेत.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताला लोकेश राहुलच्या रुपाने पहिला धक्का बसला. लोकेश राहुलला भोपळाही फोडू न देता ब्रॉडने स्टोक्सकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ मुरली विजयही (20) अँडरसनच्या उसळत्या चेंडूवर स्टोक्सकडे झेल देत बाद झाल्याने भारताला दुसरा धक्का बसला आणि भारताची स्थिती 2 बाद 22 अशी बिकट झाली होती. तर रहाणे 23 धावांवर झेलबाद झाला.
आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला होता. सलामीवीर गौतम गंभीरच्या जागी लोकेश राहुलचा संघात समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहलीने तसे संकेत याआधीच दिले होते. गंभीरला मिळालेल्या संधीमध्ये अपेक्षित छाप उमटवता आली नाही. राजकोटची पहिली कसोटी अनिर्णीत राहिली असली तरी, भारतीय संघ बॅकफूटवर ढकलला गेला होता.