आठ अविवाहित महिला बॉक्सरची जबरीने गर्भ चाचणी
By Admin | Updated: November 6, 2014 00:51 IST2014-11-06T00:51:39+5:302014-11-06T00:51:39+5:30
द. कोरियात पुढील आठवड्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ महिला बॉक्सर्सची गर्भ चाचणी करण्यात आली आहे.

आठ अविवाहित महिला बॉक्सरची जबरीने गर्भ चाचणी
नवी दिल्ली : द. कोरियात पुढील आठवड्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ महिला बॉक्सर्सची गर्भ चाचणी करण्यात आली आहे. यात अविवाहित आणि ज्युनियर गटाच्या खेळाडूंचाही समावेश आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) सल्लागार डॉ. पीएसएम चंद्रन यांनी ही माहिती दिली. चंद्रन यांनी पुढे दावा केला की या बॉक्सर्सना गर्भ चाचणीसाठी बाध्य करण्यात आले. ज्या आठ अविवाहित मुलींची बळजबरीने गर्भ चाचणी झाली त्यात काही ज्युनियर खेळाडू आहेत. हे मानवाधिकारचे उल्लंघन आहे.’
चंद्रन पुढे म्हणाले,‘ नियमाविरुद्ध असलेला हा प्रकार धक्कादायक आहे. बॉक्सिंग इंडियाचे सचिव जय कवळी यांनी या प्रकाराबाबत कानावर हात ठेवले.‘ आपल्याला हा प्रकार माहिती नाही, इतकेच ते म्हणाले.’
चंद्रन यांनी घडलेला प्रकार घृणास्पद असल्याचे सांगून राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाने हे प्रकरण हाताळावे अशी मागणी केली. क्रीडाक्षेत्रात येणाऱ्या महिला खेळाडूंचे अधिकार आणि मर्यादा यांचे रक्षण करण्याची जबाबदारी मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्यांची आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)