महाराष्ट्रातील कर्णबधिरांचे शिक्षण
By Admin | Updated: September 27, 2014 03:02 IST2014-09-27T02:10:49+5:302014-09-27T03:02:08+5:30
महिन्याचा शेवटचा आठवडा जागतिक कर्णबधिर आठवडा म्हणून साजरा केला जातो़ त्यानुसार २८ सप्टेंबर या दिवसाला जागतिक कर्णबधिर दिन म्हणून संबोधण्यात

महाराष्ट्रातील कर्णबधिरांचे शिक्षण
स्वाती सदाकळे
कर्णबधिरांना शिकविणा-या अध्यापिका
महिन्याचा शेवटचा आठवडा जागतिक कर्णबधिर आठवडा म्हणून साजरा केला जातो़ त्यानुसार २८ सप्टेंबर या दिवसाला जागतिक कर्णबधिर दिन म्हणून संबोधण्यात येते़ वर्ल्ड फेडरेशन फॉर डेफ या जागतिक संस्थेची स्थापना सप्टेंबर १९५१ मध्ये रोम, इटली येथे झाली, तेव्हापासून हा जागतिक कर्णबधिर दिन म्हणून पाळला जातो़ शिक्षणामुळेच कर्णबधिर अपंगांचा विकास होतो व ही सुरुवात शाळेपासून होते़
महाराष्ट्रातील पहिली कर्णबधिर शाळा सन १८८५मध्ये मुंबई येथे बॉम्बे इन्स्टिट्यूशन फॉर दि डेफ अँड म्यूट माझगाव, मुंबई या नावाने सुरू झाली़ त्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतरही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कर्णबधिर शाळा सुरू झालेल्या आहेत़ सन १९९०मध्ये ही
१००च्या जवळपास असणारी संख्या आज २०१४मध्ये ३८३वर पोहोचली असून, जवळपास १६४०० कर्णबधिर विद्यार्थी आज शिक्षणाचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थामार्फत कर्णबधिरांसाठी सर्वांत जास्त शाळा चालविण्यात येतात. महाराष्ट्रामध्ये कर्णबधिरांसाठी पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे सामाजिक न्याय विभागाच्या अपंगकल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली अपंगांच्या शाळांमधून दिले जाते. त्याचप्रमाणे, शिक्षण खात्यांतर्गत कार्यरत असलेल्या अपंग एकात्मिक घटकाच्या इंटिग्रेशन युनिट (माध्यमिक युनिट)मधून तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गतही अशा कर्णबधिर मुलांच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे़
एका पाहणीत असे आढळून आले आहे, की दर हजार मुलांमागे १ ते ४ मुले कर्णबधिर जन्मतात.़ बोलणे चालू होण्याअगोदर असणारा हा बहिरेपणा बालकाला कायमचे अपंगत्व देतो व मूकबधिर बनवितो़ आज आपल्या देशातील जन्मजात कर्णबधिरांमध्ये दर हजारातील ६४४ कर्णबधिर व्यक्ती अशिक्षित राहतात, तर ७० मुले माध्यमिक शाळेपर्यंतचे शिक्षण घेतात. त्यातून ३० मुले एसएससीपर्यंतचे शिक्षण घेतात आणि ७ मुले पदवी उत्तीर्ण होतात़
कर्णबधिर अपंग मुलांच्या गरजा आणि उपयुक्तता विचारात घेऊन मे १९९०पासून समाजकल्याण संचालनालयाने महाराष्ट्रातील कर्णबधिर शाळांसाठी एका समान अभ्यासक्रमाची सुरुवात केली, त्याला आज दोन तपाचा कालावधी लोटला आहे़ १९८६च्या शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणांचा विचार करून सर्वसामान्य शाळांप्रमाणेच अभ्यासक्रमात विषयाची मांडणी केलेली आहे़ सदर अभ्यासक्रम पूर्व प्राथमिक, पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी अशा तीन स्तरांवर विभागला आहे. या समान अभ्यासक्रमामध्ये कर्णबधिर मुलाचे शाळेत येण्याचे वय ३ वर्षे धरून पायऱ्यांचा व इयत्तांचा कालावधी ठरविलेला आहे़ त्याप्रमाणे कृती न करता कर्णबधिरांच्या काही शाळा ४ पायऱ्यांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण पूर्ण करतात, तर काही शाळा ५ पायऱ्यांमध्ये पूर्ण करतात़ तर, अर्ली एंटरव्हेशन पद्धतीमध्ये पूर्व प्राथमिक स्तर दोन किंवा तीन वर्षांचा असतो़ त्याचप्रमाणे काही शाळा तिसरी व चौथीचा अभ्यासक्रम प्रत्येकी १ वर्षात, तर काही शाळा प्रत्येकी दीड वर्षात पूर्ण करतात़ यामध्येही एकवाक्यता आढळून येत नाही़ यामुळे कर्णबधिर मुलांचा शैैक्षणिक कालावधी कमीजास्त ठरतो़ हे टाळण्यासाठी बदललेल्या शैक्षणिक साधनांचा विचार करून या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापून व सुधारित समान अभ्यासक्रम तयार करून त्यामध्ये वेळोवेळी बदल घडावेत़
कमीत कमी ८ मुलांचा हा वर्ग असतो़
समूह श्रवणयंत्राचा वापर करून त्यांना शिकवावे लागते़ ई-लर्निंग पद्धतीचा वापर केल्यास
त्यांना अमूर्त संकल्पनांचे आकलन होण्याच्या
दृष्टीने खूप फायदा होत असल्याचे आढळले
आहे़ त्यामुळे प्रत्येक कर्णबधिरांच्या शाळेत ही
पद्धत चालू करण्याची सक्ती संबंधित खात्यामार्फत व्हावी, असे वाटते़
कर्णबधिर विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या काही संपर्कपद्धती रूढ आहेत़ त्यामध्ये केवळ बोलून/ऐकून शिकणे, खुणांद्वारे शिकणे किंवा संपूर्ण संपर्क पद्धतीने शिकणे अशा वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. आजचे युग बालककेंद्री शिक्षणपद्धतीचे असल्याने योग्य संपर्क पद्धती असलेले शिक्षण निवडण्याचा प्रत्येक कर्णबधिर बालकाला हक्क आहे. त्यांच्यावर
केवळ ऐकून व बोलूनच भाषा शिकण्याची
किंवा केवळ खुणांचीच भाषा शिकण्याची सक्ती करू नये. कर्णबधिरत्वाचे लवकरात लवकर झालेले निदान, योग्य साधनांचा वापर, सुजाण पालक व मेहनती शिक्षकाचे परिश्रम यांवरही शिक्षण अवलंबून असते़
काही कर्णबधिर शाळा विद्यार्थ्यांना इयत्ता सातवी उत्तीर्ण झाल्यानंतर १७ नं़ चा फॉर्म भरून खासगी विद्यार्थी म्हणून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेस बसवितात़ त्या वेळी त्यास
इंग्रजी हा विषय सोडून इतर विषय घेऊन बसविले जाते. विद्यार्थी बऱ्यापैकी गुण मिळवून उत्तीर्णही होतो; पण शिक्षणाची पुढील दारे त्याला बंद राहतात, कारण इंग्रजी हा विषय घेऊनच
दहावी उत्तीर्ण झाल्यास तो अकरावी प्रवेशास तो पात्र होतो़ या संदर्भात असे सूचित करावेसे वाटते, की या मुलांना दहावीसाठी इंग्रजी विषय घेऊनच बसवावे़ त्यामुळे पुढील शिक्षणाचा त्यांचा मार्ग मोकळा होऊ शकतो़