कोलकाताचा सहज विजय
By Admin | Updated: May 12, 2014 05:10 IST2014-05-12T04:25:10+5:302014-05-12T05:10:12+5:30
कोलकाता नाईट रायडर्सने सांघिक खेळाचा पुन्हा एकदा नजराणा पेश करत तगड्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर ९ विकेट्स राखून विजय साजरा केला.

कोलकाताचा सहज विजय
कटक : कोलकाता नाईट रायडर्सने सांघिक खेळाचा पुन्हा एकदा नजराणा पेश करत तगड्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर ९ विकेट्स राखून विजय साजरा केला. या विजयाबरोबर कोलकाताने स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे. सलामीवीर रॉबीन उथप्पा (४६) आणि गौतम गंभीर (६३*) यांच्या दमदार खेळानंतर मनीष पांडेनेही (३६*) सुरेख खेळ करत पंजाबने विजयासाठी ठेवलेले १४९ धावांचे लक्ष्य १८व्या षटकांतच पूर्ण केले. त्तपूर्वी पीयुष चावल्याच्या फिरकीने पंजाबच्या धावांवर अंकुश ठेवला. सेहवाग खेळला, पण... २५-३० धावांवर समाधान मानून तंबूत परतणार्या विरेंद्र सेहवागला कोलकाताविरुद्ध सूर गवसला आणि त्याने तुफान फटकेबाजी मारून ७२ धावांची खेळी केली. पण, त्याच्या या खेळीवर इतर फलंदाजांना इमले उभारता न आल्याने पंजाबला निर्धारित २० षटकांत ८ बाद १४९ धावांवरच समाधान मानावे लागले. आज सेहवाग भलत्याच फॉर्मात होता आणि त्याने जॅक कॅलिसच्या पहिल्याच षटकात १७ धावा चोपून याचा नजराणा दाखवला. मनदीप सिंह मात्र भोपळाही न फोडता मॉर्ने मॉर्केलच्या गोलंदाजीवर रॉबीन उथप्पाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. वृद्धिमान सहाही ९ चेंडूंत ३ चौकारांसह १५ धावा करून मॉर्केलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. या दोन विकेट्स फटाफट पडल्या असल्या तरी सेहवाग कुणाला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. एरवी मुक्तपणे फटकेबाजी मारणारा मॅक्सवेल थोडासा सैरभैर दिसला. पीयुष चावलाच्या फिरकीचे त्याला उत्तर सापडत नव्हते आणि ११व्या षटकांत तो चावलाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. सेहवागने मात्र एक बाजूने फटकेबाजी करत ५० चेंडूंत ११ चौकार व एक षटकार खेचून ७२ धावांची खेळी केली. सेहवागला चावलाने त्रिफळाचीत केले. शेवटच्या षटकात खोर्याने धावा करून मोठा पल्ला गाठण्याची जबाबदारी मिलर व बेली यांच्यावर होती. मात्र, मिलर (१३) माघारी परतला. मिशेल जॉन्सनने शेवटच्या षटकात १ चौकार व १ षटकार खेचून संघाला दिडशेसमीप पल्ला गाठून दिला. (वृत्तसंस्था)