जपानचा पोलंडवर सहज विजय
By Admin | Updated: October 12, 2016 21:46 IST2016-10-12T21:46:59+5:302016-10-12T21:46:59+5:30
कझुहिरो तकानो आणि कर्णधार मासायुकी शिमोकावा यांच्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर जपानने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवताना पोलंडचा

जपानचा पोलंडवर सहज विजय
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि.12 - कझुहिरो तकानो आणि कर्णधार मासायुकी शिमोकावा यांच्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर जपानने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवताना पोलंडचा ३३-२२ असा पराभव केला. या विजयासह जपानने 'ब' गटात १० गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली.
आक्रमक सुरुवात केलेल्या जपानला या सामन्यात पोलंडकडून काहीवेळ कडवी टक्कर मिळाली. परंतु, अनुभवाच्या बाबतीत वरचढ ठरल्याने जपानने अपेक्षित विजय मिळवताना स्पर्धेतील सलग दुसरा विजय मिळवला.
कर्णधार शिमोकावा याने आपला प्रो कबड्डीतील अनुभव पणास लावताना आक्रमणात ४ तर बचावामध्ये ३ असे एकूण ७ गुणांची कमाई करताना जबरदस्त अष्टपैलू खेळ केला. त्याने पोलंडच्या प्रमुख चढाईपटूंची भक्कम पकड करताना त्यांच्या आक्रमणातील हवा काढली. त्याचवेळी, कझुहिरो याने चढाईमध्ये ७ आणि बचावामध्ये १ गुण मिळताना एकूण ८ गुणांसह निर्णायक कामगिरी केली. खोलवर आणी वेगवान चढाई करताना त्याने पोलंडच्या क्षेत्रात चांगले वर्चस्व राखले.
दुसरीकडे, पोलंडच्या जॅन बारॅनोविच याने सर्वाधिक ९ गुणांची कमाई करतान संघाचा पराभव टाळण्याचा अपयशी प्रयत्न केला. कर्णधार मायकल स्पिझको यानेही आक्रमणात ४ गुण मिळवताना त्याला चांगली साथ दिली. बचावामध्ये पोलंडकडून अनेक चुका झाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.
मध्यंतराला जपानने २०-१० अशी १० गुणांची मोठी आघाडी मिळवली होती. जपानने पोलंडवर एक लोण चढवून सामन्यावर नियंत्रण राखले. पोलंडचा हा सलग तिसरा पराभव ठरला.