आॅलिम्पिकपूर्वी ताकदीने मेहनत करण्यास उत्सुक : योगेश्वर
By Admin | Updated: August 26, 2015 04:18 IST2015-08-26T04:18:35+5:302015-08-26T04:18:35+5:30
आॅलिम्पिक कोटा मिळवण्याबाबत आश्वस्त असलेला भारताचा स्टार कुस्तीपटू योगेश्वर दत्तने म्हटले आहे की, लवकर पात्रता मिळाली तर आॅलिम्पिकपूर्वी तगडी मेहनत करेन, तसेच

आॅलिम्पिकपूर्वी ताकदीने मेहनत करण्यास उत्सुक : योगेश्वर
नवी दिल्ली : आॅलिम्पिक कोटा मिळवण्याबाबत आश्वस्त असलेला भारताचा स्टार कुस्तीपटू योगेश्वर दत्तने म्हटले आहे की, लवकर पात्रता मिळाली तर आॅलिम्पिकपूर्वी तगडी मेहनत करेन, तसेच ‘रियो’साठी सज्ज होईन. लंडन आॅलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्त आता ७ ते १२ सप्टेंबर दरम्यान लॉस वेगास येथे होणाऱ्या विश्व चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होणार आहे. आॅलिम्पिकपूर्वी होणारी ही पात्रता फेरी स्पर्धा असल्याने ती त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या स्पर्धेत सर्वाेत्तम कामगिरी करून आपणास पात्रता मिळवायची आहे, असे तो म्हणाला.
योगेश्वर म्हणाला, विश्व चॅम्पियनशीपमध्ये मला भारतासाठी आॅलिम्पिक कोटा मिळेल, याबाबत पूर्ण विश्वास आहे. लवकर पात्रता मिळाली तर सरावासाठी अधिक वेळ मिळेल आणि पूर्ण ताकदीने मेहनत करण्याची संधी मिळेल. पुढील वर्षांसाठी दुखापतमुक्त राहणे हेच माझ्यासाठी महत्त्वाचे असेल. त्याबाबतही मला काळजी घ्यावी लागेल.
मला बऱ्याच शस्त्रक्रियांचा सामनाही करावा लागला आहे. त्यामुळे आगामी काळात पूर्ण फिट राहणे हेच माझ्यासाठी आव्हानात्मक असेल. या ३२ वर्षीय पहेलवानाला गुडघ्यात दुखापत झाली होती. आता तो त्यातून पूर्णपणे सावरला आहे. (वृत्तसंस्था).