दुष्यंत चौहानसाठी हवा ठरली ‘शापित’
By Admin | Updated: September 25, 2014 03:38 IST2014-09-25T03:38:15+5:302014-09-25T03:38:15+5:30
आशियाई स्पर्धेतील बुधवारचा दिवस हा भारताचा रोविंगपटू दुष्यंत चौहान याच्यासाठी ‘शापित’ ठरला.

दुष्यंत चौहानसाठी हवा ठरली ‘शापित’
इंचियोन : आशियाई स्पर्धेतील बुधवारचा दिवस हा भारताचा रोविंगपटू दुष्यंत चौहान याच्यासाठी ‘शापित’ ठरला. पुरुषांच्या लाइट वेट एकेरी स्कल प्रकारात दुष्यंतचे सुवर्णपदक जवळपास निश्चित होते, परंतु अचानक हवेने दिशा बदलली आणि हाताशी आलेले सुवर्ण त्याच्याकडून निसटले.
सामन्याच्या सुरुवातीपासून दुष्यंतचा वेग हा हवेला आणि पाण्याचा चिरत आघाडीकडे जात होता. हरियाणाच्या या खेळाडूने स्पर्धेत २,००० मीटरपर्यंत आघाडी घेतली होती, परंतु अचानक वातावरणात आलेल्या बदलामुळे आणि रिमझिम पावसाने त्याची लय बिघडली. २,००० मीटरपर्यंत आघाडीवर असूनही त्याला ७ मिनिटे २६:५७ सेकंदांची वेळ नोंदवून कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तो म्हणाला, मला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र बदललेल्या हवेने माझ्या मार्गात अडथळा निर्माण केला आणि त्यामुळे मी पिछाडीवर गेलो. तरीही कांस्य पटकावता आले याचे समाधान आहे.
सुवर्णपदक विजता लो क्वान हाइ याच्याहून दुष्यंत ५०० मीटर पिछाडीवर होता, परंतु त्याने आपली गती वाढवत बरोबरी साधली आणि नंतर आघाडी मिळवली. ती २,००० मीटरपर्यंत कायम राखत सुवर्णपदकाच्या अगदी तो जवळ पोहोचला होता. त्याला केवळ सुवर्णने नाही तर रौप्यनेही हुलकावणी दिल्याने कांस्यवर समाधान मानावे लागले. यजमानांचा ली हॉकबियोम याने ७ मिनिटे २५:९५ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्य पटकावले. नेमबाजांच्या निराशाजनक कामगिरीनंतर आजच्या दिवसाचे हे भारताचे पहिले पदक ठरले. दुष्यंतच्या कांस्यपदकावर रोविंग फेडरेशन आॅफ इंडियाचे सचिव एम़ व्ही़ श्रीराम यांनीही खंत व्यक्त केली. ते म्हणाले, की संपूर्ण स्पर्धेत तो आघाडीवर होता आणि तो सुवर्ण जिंकू शकला असता.