रोहितच्या शतकावर ड्युमिनीचे पाणी
By Admin | Updated: October 3, 2015 00:35 IST2015-10-03T00:35:43+5:302015-10-03T00:35:43+5:30
यांनी चौथ्या विकेटसाठी ९.१ षटकांत १०५ धावांची अभेद्य भागीदारी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात एबी डीव्हिलियर्स (५१) आणि हाशिम अमला (३६) यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली.

रोहितच्या शतकावर ड्युमिनीचे पाणी
धरमशाला : जेपी ड्युमिनीच्या आक्रमक नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा ७ गडी व २ चेंडू राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रोहित शर्माची शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली.
भारताने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेतर्फे ड्युमिनी (नाबाद ६८) आणि फरहान बेहार्डीन (नाबाद ३२) यांनी चौथ्या विकेटसाठी ९.१ षटकांत १०५ धावांची अभेद्य भागीदारी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात एबी डीव्हिलियर्स (५१) आणि हाशिम अमला (३६) यांची कामगिरीही उल्लेखनीय ठरली. ड्युमिनीने ३४ चेंडूंना सामोरे जाताना एक चौकार व ७ षटकार ठोकले.
त्याआधी, टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरलेल्या रोहित शर्माचे (१०६) पहिले शतक आणि त्याने विराट कोहलीसोबत (४३) दुसऱ्या विकेटसाठी १२.२ षटकांत केलेल्या १३८ धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारताने ५ बाद १९९ धावांची मजल मारली. रोहित शर्माने ६६ चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने भारतातर्फे सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली.
भारताकडून कुठल्याही गड्यासाठी ही मोठी भागीदारी ठरली. याआधी वीरेंद्र सेहवाग-गौतम गंभीर यांनी १९ सप्टेंबर २००७ ला इंग्लंडविरुद्ध दरबन येथे सलामीला १३६ धावांची भागीदारी केली होती. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात शतक ठोकणारा रोहित भारताचा दुसरा आणि जगातील १३ वा फलंदाज आहे. यापूर्वी सुरेश रैना याने शतक झळकाविले होते.
पहिल्याच टी-२०चे यजमानपद भूषविणाऱ्या हिमाचल प्रदेश संघटनेच्या मैदानावर उपस्थित चाहत्यांना भारतीय संघाने निराश केले नाही. द. आफ्रिकेविरुद्ध येथे सर्वाधिक धावा नोंदविल्या. याआधी मे २०१० मध्ये भारताने ग्रास आयलेट संघाविरुद्ध पाच गड्यांच्या मोबदल्यात १८६ धावा केल्या होत्या. भारताने आज टी-२० सामन्यात चौथी सर्वाधिक धावसंख्या नोंदविली. द. आफ्रिकेकडून वेगवान गोलंदाज
केली एबोट याने २९ धावांत दोन गडी बाद केले. त्याआधी फाफ डु प्लेसीस याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरविला.
रोहित सुरुवातीपासून फॉर्ममध्ये होता. त्याने सुरुवात चौकारासह केली; पण शिखर धवन अवघ्या तीन धावांवर धावबाद झाला. रोहितने यानंतर खेळाची सूत्रे स्वत:कडे घेत ३९ चेंडूंत अर्धशतक गाठले. कोहलीच्या सोबतीने १२ व्या षटकात संघाच्या १०० धावा फळ्यावर लावल्या. या दरम्यान कोहलीनेदेखील या प्रकारात हजार धावांचा पल्ला गाठला. यानंतर रोहितने ६२ चेंडूंत स्वत:चे पहिले शतक पूर्ण केले.
एबोटचा चेंडू पूल करण्याच्या नादात तो नंतर झेलबाद झाला. सुरेश रैना १४ धावा काढून मॉरिसच्या चेंडूवर पायचित होऊन परतला. अखेरच्या पाच षटकांत भारताने ४१ धावा
वसूल केल्या. कर्णधार धोनी याने
१२ चेंडूंत २० धावांचे योगदान
दिले. (वृत्तसंस्था)
----------
विराट हजार धावा करणारा पहिला भारतीय
विराट कोहली हा टी-२० प्रकारात हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. द. आफ्रिकेविरुद्ध
शुक्रवारी २८ धावा करताच विराटने हजारचा टप्पा गाठला. या सामन्याआधी त्याने २८ सामन्यात ९७२ धावा केल्या होत्या. अशी कामगिरी करणाऱ्या जगातील फलंदाजांमध्ये
तो २० व्या स्थानावर आहे.
---------
धावफलक
भारत : - रोहित शर्मा झे. मॉरिस गो. एबोट १०६, शिखर धवन धावबाद ३, विराट कोहली झे. ड्युमिनी गो. एबोट ४३, सुरेश रैना पायचित गो. मॉरिस १४, महेंद्रसिंह धोनी नाबाद २०, अंबाती रायुडू धावबाद ००, अक्षर पटेल नाबाद २, अवांतर : ११, एकूण : २० षटकांत ५ बाद १९९. गडी बाद क्रम : १/२२, २/१६०, ३/१६२, ४/१८४, ५/१८४. गोलंदाजी : एबोट ४-०-२९-२, रबाडा ४-०-३२-०, डीलांगे ४-०-४७-०, ख्रिस मॉरिस ४-०-४६-१, इम्रान ताहिर ३-०-३५-०, जेपी ड्युमिनी १-०-८-०.
दक्षिण आफ्रिका :- हाशिम अमला धावबाद ३६, एबी डीव्हिलियर्स त्रि. गो. आश्विन ५१, फाफ डू प्लेसीस त्रि. गो. अरविंद ०४, जेपी ड्युमिनी नाबाद ६८, फरहान बेहार्डीन नाबाद ३२. अवांतर : ९. एकूण : १९.४ षटकांत ३ बाद २००. बाद क्रम : १-७७, २-९३, ३-९५. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-४०-०, अरविंद ३.४-०-४४-१, मोहित ४-०-४०-०, अक्षर ४-०-४६-१, आश्विन ४-०-२६-१.