ड्युमिनीने दिले संघात बदल करण्याचे संकेत

By Admin | Updated: April 28, 2015 00:33 IST2015-04-28T00:33:56+5:302015-04-28T00:33:56+5:30

सात सामन्यांत चौथ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार जेपी ड्युमिनीने फॉर्मात नसलेल्या युवराजसिंगची पाठराखण केली

Duminy indicated for a change in the team | ड्युमिनीने दिले संघात बदल करण्याचे संकेत

ड्युमिनीने दिले संघात बदल करण्याचे संकेत

नवी दिल्ली : सात सामन्यांत चौथ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार जेपी ड्युमिनीने फॉर्मात नसलेल्या युवराजसिंगची पाठराखण केली असली तरी आगामी सामन्यांमध्ये संघात बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
डेअरडेव्हिल्स संघाला रविवारी फिरोजशाह कोटलावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाविरुद्ध दारुण पराभव स्वीकारावा लागला. बंगलोरने ही लढत ५७ चेंडू व १० गडी राखून जिंकली. दिल्ली संघ प्रथम फलंदाजी करताना केवळ ९५ धावांत गारद झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना ख्रिस गेलच्या नाबाद ६२ धावांच्या खेळीच्या जोरावर बंगलोर संघाने सहज विजयाची नोंद केली.
ड्युमिनी म्हणाला, ‘केवळ एकट्या युवराजला दोषी धरणे चुकीचे आहे. आमची सर्वांची कामगिरी निराशाजनक झाली. पहिल्या षटकात विकेट गमावल्यापासून आम्ही बॅकफुटवर ढकलले गेलो. संघाला पुन्हा विजयी मार्गावर येण्यासाठी सांघिक कामगिरीची गरज आहे. यानंतर आम्हाला येथे आणखी एक लढत खेळायची आहे. आम्ही स्थानिक चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे.’
वेगवान गोलंदाज झहीर खान दुखापतीमुळे अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही, तर मोहम्मद शमीने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे डेअरडेव्हिल्स संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत झाली आहे.
झहीर सामना खेळण्यासाठी उत्सुक असल्याचे ड्युमिनी म्हणाला. झहीर ९५ टक्के फिट असून तो पुनरागमन करण्यास उत्सुक असल्याचे ड्युमिनीने सांगितले. (वृत्तसंस्था)

ही निराशाजनक कामगिरी आहे. फलंदाजी व गोलंदाजी या विभागात कामगिरीत सातत्य राखण्यात आम्ही अपयशी ठरत आहोत. स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी यानंतर खेळल्या जाणाऱ्या लढतींमध्ये प्रत्येक खेळाडूला सध्याच्या तुलनेत किमान १० टक्के अधिक चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आरसीबीने चांगली गोलंदाजी केली. त्यांनी प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. या पराभवातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले. संघात बदल करण्याची गरज आहे का, याबाबत आगामी काही दिवस आम्ही विचार करू. मी मोठे फेरबदल करण्याबाबत बोलत नाही. तसे बघता संघ निवड करणे माझ्या अधिकारामध्ये नाही. - जे. पी. ड्युमिनी

आयपीएलच्या लिलावामध्ये विक्रमी १६ कोटी रुपयांना करारबद्ध करण्यात आलेल्या युवराजची कामगिरी चांगली होत नसल्यामुळे संघावर दडपण आले आहे. युवराजने ७ सामन्यांत १७.७१ च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. रविवारी त्याच्याकडे मोठी खेळी करण्याची चांगली संधी होती, पण तो केवळ २ धावा काढून माघारी परतला. ड्युमिनीने युवराजची पाठराखण केली आणि वेगवान गोलंदाज झहीर खानच्या पुनरागमनाचे संकेत दिले.

Web Title: Duminy indicated for a change in the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.