बंगळुरू कसोटीसाठी ड्युमिनी तंदुरुस्त
By Admin | Updated: November 8, 2015 23:40 IST2015-11-08T23:40:54+5:302015-11-08T23:40:54+5:30
भारताकडून मोहाली कसोटीत सपाटून पराभव पत्करावा लागणारा नंबर वन कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेला त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनी दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होऊ शकतो

बंगळुरू कसोटीसाठी ड्युमिनी तंदुरुस्त
बंगळुरू : भारताकडून मोहाली कसोटीत सपाटून पराभव पत्करावा लागणारा नंबर वन कसोटी संघ दक्षिण आफ्रिकेला त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू जेपी ड्युमिनी दुसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध होऊ शकतो, त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मोहालीत तीन दिवसांतच १०८ धावांनी पराभव पत्करावा लागणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू ड्युमिनी वन डे मालिकेच्या चौथ्या सामन्यापासून संघाबाहेर होता; परंतु तो बंगळुरूत १४ नोव्हेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात संघात असणार आहे. ड्युमिनीला राजकोट येथे झालेल्या तिसऱ्या वन डेत हाताला दुखापत झाली होती आणि तेव्हापासून तो संघाकडून खेळू शकला नव्हता.
ड्युमिनीच्या हाताचे टाके दोन दिवसांआधीच काढण्यात आले आहेत आणि पुढील काही दिवसांतच तो सरावासाठी मैदानात उतरणार आहे आणि त्यानंतर बंगळुरू कसोटीत त्याचा संघात समावेश करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे दक्षिण आफ्रिकेचे संघ व्यवस्थापक मोहम्मद मुसाजी यांनी सांगितले. मोहाली कसोटीत ड्युमिनीची दक्षिण आफ्रिकेला विशेष उणीव भासली होती. कारण तो मधल्या फळीतील फलंदाज असून संघाचा महत्त्वपूर्ण आॅफस्पिनरदेखील आहे. फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ड्युमिनी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो; परंतु तो पहिल्या कसोटीत नसल्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले.