पावसामुळे आॅसींचा विजय लांबणीवर
By Admin | Updated: November 8, 2015 23:35 IST2015-11-08T23:35:52+5:302015-11-08T23:35:52+5:30
आॅस्ट्रेलिया आणि विजय यांच्यामध्ये खंबीरपणे उभे राहिलेल्या केन विलियम्सनला वादग्रस्तरीत्या बाद दिल्यानंतर, पावसाने न्यूझीलंडवर मेहेरबान होत

पावसामुळे आॅसींचा विजय लांबणीवर
ब्रिस्बेन : आॅस्ट्रेलिया आणि विजय यांच्यामध्ये खंबीरपणे उभे राहिलेल्या केन विलियम्सनला वादग्रस्तरीत्या बाद दिल्यानंतर, पावसाने न्यूझीलंडवर मेहेरबान होत आपला खेळ दाखविल्याने आॅस्ट्रेलियाचा विजय तूर्तास लांबला आहे. ५0४ धावांच्या विशालकाय लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडने चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा ३ बाद १४२ धावा केल्या होत्या.
पहिल्या डावात १४0 धावा करणाऱ्या विलियम्सनने दुसऱ्या डावातही खेळपट्टीवर तंबू ठोकत ५५ चेंडंूत ५0 धावा केल्या होत्या; परंतु तो चहापानाअगोदर एका विवादास्पद निर्णयाचा शिकार ठरला; पण यानंतर दोनच षटकांचा खेळ शक्य झाला. कारण, चहापानानंतर पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबविण्यात आला. या वेळी न्यूझीलंडच्या रॉस टेलरने २0, तर कर्णधार ब्रँडन मॅक्युलम चार धावांवर खेळत होते.
विलियमन्सला इंग्लंडचे पंच रिचर्ड इलिंगवर्थला लेगस्पीनर नाथन लियोनच्या चेंडूवर पायचित बाद दिले. विलियम्सनला हा निर्णय मान्य झाला नाही. त्याने रेफरल मागितले. रिप्लेमध्ये चेंडू आॅफस्टम्पच्या बाहेर वळताना बेल्सच्या वरच्या भागाला घासून जात असल्याचे दिसत होते. टीव्ही पंचांनी इलिंगवर्थ यांचा निर्णय कायम ठेवला.
पावसामुळे आज दोनदा व्यत्यय आला, चहापानानंतर अजिबातच खेळ होऊ शकला नाही. तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाने कालच्या ५0३ च्या आघाडीवर आपला डाव जाहीर केला. न्यूझीलंडने प्रथमपासूनच बचावात्मक पवित्रा घेतला. त्यांचा सलामीवीर मार्टिन गुप्तील याने खाते उघडण्यासाठी २४ चेंडू खेळले. त्याला शून्य आणि सात धावांवर जीवनदान मिळाले. शेवटी तो २३ धावा करून, लियोनच्या गोलंदाजीवर बाद झाला. गुप्तीलचा साथीदार टॉम लॅथम सकाळच्या सत्रात २९ धावा करून बाद झाला.
संक्षिप्त धावफलक :
आॅस्ट्रेलिया प. डाव : ४ बाद ५२६ (घोषित); न्यूझीलंड प. डाव : सर्वबाद ३१७; आॅस्ट्रेलिया दु. डाव : ४ बाद २६४ (घोषित);
न्यूझीलंड दुसरा डाव : टॉम लॅथन पायचित गो. स्टार्क २९, मार्टिन गुप्तील झे. स्मिथ गो. लियोन २३, केन विलियम्सन पायचित गो. लियोन ५९. अवांतर - ७, एकूण ५३ षटकांत ३ बाद १४७ धावा. गडी बाद क्रम : १/४४, २/९८, ३/१३६. गोलंदाजी : मिशेल स्टार्क १३-४-२४-१, मिशेल जॉन्सन १३-५-४२-0, जोश हेजलवूड : १0-३-२४-0, मिशेल मार्श : ६-३-१३-0, नाथन लियोन ११-0-३३-२.