हॉटेलचे बिल न भरल्याने मूकबधिर खेळाडूंचे पासपोर्ट जप्त
By Admin | Updated: October 8, 2015 04:11 IST2015-10-08T04:11:48+5:302015-10-08T04:11:48+5:30
चीनमधील ताईपै येथे होणाऱ्या मूकबधिरांच्या आशिया पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यास गेलेल्या भारतीय खेळाडूंच्या अडचणी काही कमी होण्यास तयार नाहीत.

हॉटेलचे बिल न भरल्याने मूकबधिर खेळाडूंचे पासपोर्ट जप्त
नवी दिल्ली : चीनमधील ताईपै येथे होणाऱ्या मूकबधिरांच्या आशिया पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यास गेलेल्या भारतीय खेळाडूंच्या अडचणी काही कमी होण्यास तयार नाहीत. एक रात्र फुटपाथवरच काढावी लागल्यानंतर हॉटेलचे बिल न भरल्यामुळे त्यांचा पासपोर्टही जप्त करण्यात आला आहे. यानंतर मात्र क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणात लक्ष घातले आहे. ३ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारताचे ४१ खेळाडू व १२ अधिकारी जाणार होते. मात्र, भारताचे २७ खेळाडूच या स्पर्धेसाठी रवाना झाले. याची माहिती स्पर्धा आयोजकांना दोन आठवड्यांपूर्वीच देण्यात आली असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, ताओयुआन येथे गेल्यानंतर अगोदरच राखीव केलेल्या हॉटेलचे बिल भारतीय संघाला भरण्यास सांगण्यात आले. संघात झालेल्या बदलाची माहिती हॉटेलपर्यंत पोहोचली नसल्याने हे बिल सुमारे ७,२०० डॉलर जास्त होते. यामुळे हॉटेल प्रशासनाने खेळाडूंचे पासपोर्ट व परदेशी चलनही जप्त केले आहे.
स्पर्धेला जाण्यापूर्वी व्हिसाची वाट पाहत खेळाडूंना रात्री फुटपाथवरच झोपावे लागले होते. अधिकाऱ्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था केली नव्हती. या सर्व प्रकरणाच्या चौकशीचे आदेश क्रीडामंत्री सोनोवाल यांनी दिले आहेत.(वृत्तसंस्था)