द्रविडने स्टान्स बदलण्याचा दिला होता सल्ला : पुजारा
By Admin | Updated: November 12, 2015 23:25 IST2015-11-12T23:25:13+5:302015-11-12T23:25:13+5:30
चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात पुजाराने आपल्या यशाचे श्रेय ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला दिले आहे

द्रविडने स्टान्स बदलण्याचा दिला होता सल्ला : पुजारा
बेंगळुरू : चेतेश्वर पुजाराने पुन्हा एकदा सूर गवसल्याचे संकेत दिले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात पुजाराने आपल्या यशाचे श्रेय ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडला दिले आहे. द्रविडने मला स्टान्स बदलण्याचा सल्ला दिला होता, असे पुजाराने स्पष्ट केले.
पुजाराला आॅस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान अंतिम संघातून वगळण्यात आले होते. पुजाराने फलंदाजांसाठी खडतर ठरलेल्या खेळपट्ट्यांवर श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या कसोटी सामन्यात नाबाद १४५ आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७७ धावांची खेळी करीत शानदार पुनरागमन केले.
पुजाराने आपल्या यशाच्या रहस्याचा सविस्तरपणे उलगडा केला नाही, पण द्रविडने त्याला स्टान्स (पायातील अंतर कमी करण्याचा) छोटा करण्याचा सल्ला दिला होता, असे सांगितले. पुजारा म्हणाला,‘मला माझ्या स्टान्सबाबत माहिती आहे. आता मी स्टान्स लहान केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी मी माझे वडील अरविंद पुजारा (माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू) आणि राहुलसोबत चर्चा केली आणि मी काय करायला पाहिजे, याचा निर्णय घेता आला. स्टान्स वैयक्तिक बाब असते. विशेष तंत्राचा अवलंब करण्यासाठी मानसिक तयारी करावी लागते.’ पुजारा पुढे म्हणाला,‘प्रत्येक स्टान्सचे फायदे व तोटे असतात. प्रत्येक खेळाडूचा स्टान्स वेगळा असतो. तुम्हाला त्यात किती सहज वाटते, याला अधिक महत्त्व असते.’
स्वत:वर विश्वास कायम राखणे, यशाचा मंत्र असल्याचे पुजाराने सांगितले. पुजारा म्हणाला,‘अंतिम संघातून वगळण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार नाही, असा विचारही माझ्या मनात कधी आला नाही. मी सुरुवात चांगली करीत होतो. स्थानिक क्रिकेटमध्ये मी चांगल्या धावा केल्या होत्या.(वृत्तसंस्था)