टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याची मुळीच इच्छा नाही : द्रविड

By Admin | Updated: June 12, 2015 10:12 IST2015-06-12T03:45:49+5:302015-06-12T10:12:25+5:30

डंकन फ्लेचर यांची रिक्त झालेली जागा पटकविण्याची अर्थात टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याची आपली कुठलीही इच्छा नसल्याचे माजी कर्णधार राहुल द्रविड याने गुरुवारी स्पष्ट केले.

Dravid does not want Team India to become coach: Dravid | टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याची मुळीच इच्छा नाही : द्रविड

टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याची मुळीच इच्छा नाही : द्रविड

मुंबई : डंकन फ्लेचर यांची रिक्त झालेली जागा पटकविण्याची अर्थात टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याची आपली कुठलीही इच्छा नसल्याचे माजी कर्णधार राहुल द्रविड याने गुरुवारी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना द्रविड म्हणाला,‘फ्लेचर यांचे स्थान घेण्यात आपल्याला रस असल्याचे वृत्त कानावर आले आहे. पण एक सांगू का, ‘हे पद स्वीकारण्यास मला कुठलेही स्वारस्य नाही. मी केवळ भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघाची धुरा सांभाळू इच्छितो. राष्ट्रीय संघाचा कोच बनण्याचा विचार माझ्या डोक्यातही आलेला नाही.’ इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्टस् मॅनेजमेंटच्या दीक्षांत सोहळ्यात अतिथी असलेल्या राहुल द्रविडसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.
द्रविड पुढे म्हणाला,‘ बांगला देश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची जबाबदारी संचालक रवी शास्त्री आणि अन्य सहयोगी स्टाफ योग्यरीत्या सांभाळत आहेत. रवी आणि त्यांचे सहकारी सक्षम असून माझी कोच बनण्याची मुळीच इच्छा नाही.’ भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघाचा कोच बनणे कुठल्याही खेळाडूंसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगून द्रविड पुढे म्हणाला, ‘मला हे काम सोपविण्यात आले, याचा आनंद वाटतो. दोन-तीन मालिका खेळायच्या असल्याने या काळात खेळाडूंना माझे अनुभव सांगेन.’ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा मेंटॉर राहण्याचा मला मोठा लाभ झाल्याचा द्रविडने आवर्जून उल्लेख केला. इतकी वर्षे खेळल्यानंतर दोन वर्षांपासून मेंटॉरची भूमिका निभावत व्यवस्थापन तसेच कोचिंग याकडे पाहण्याचा दृष्टिकोन माहित झाला.
अनुभवासोबत कामगिरी उंचावत जाते. मला या गोष्टीची प्रतीक्षा असेल.’ भारत ‘अ’ संघात खेळाडूंची निवड करण्याचा कुठलाही लेखी फॉर्म्युला नाही. निवडकर्त्यांचे वेळोवेळी वेगळे लक्ष्य असते, असे द्रविडला वाटते. काही वेळा युवा
तर काही वेळा पुनरागमनाच्या
प्रतीक्षेत असलेल्यांच्या निवडीवर भर दिला जातो.(वृत्तसंस्था)

Web Title: Dravid does not want Team India to become coach: Dravid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.