कसोटीपटूंना मिळणार ‘डबल कमाई’
By Admin | Updated: October 3, 2016 06:06 IST2016-10-03T06:06:02+5:302016-10-03T06:06:02+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कसोटीपटूंना आनंदाची बातमी देताना त्यांच्या मानधनामध्ये तब्बल दुप्पट वाढ केली आहे.

कसोटीपटूंना मिळणार ‘डबल कमाई’
मुंबई : क्रिकेटविश्वातील सर्वांत श्रीमंत संघटना म्हणून ओळखली जाणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या कसोटीपटूंना आनंदाची बातमी देताना त्यांच्या मानधनामध्ये तब्बल दुप्पट वाढ केली आहे. क्रिकेटचे पारंपरिक रूप असलेल्या ‘कसोटी’ क्रिकेटकडे अधिक आकर्षक बनविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले.
सध्या भारतीय क्रिकेटपटूंना प्रत्येक कसोटी सामन्यासाठी सात लाख रुपयांचे मानधन मिळते; मात्र आता बीसीसीआयने यामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने यापुढे प्रत्येक खेळाडूला एका सामन्यासाठी १५ लाख रुपये मिळतील. त्याचवेळी बीसीसीआयने राखीव खेळाडूंच्या मानधनामध्येही दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, राखीव खेळाडूंना ७ लाख रुपये मिळतील.
मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये बीसीसीआयने हा निर्णय घेतला. यासंबंधी बोर्डचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, ‘कसोटी क्रिकेटला अधिक प्राधान्य देण्याच्या हेतूने आम्ही खेळाडूंच्या सामना मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटला अधिक आकर्षक आणि नवीन पिढीसाठी अधिक जवळचे करण्यासाठी आम्ही या वेळी चर्चा केली. कसोटी क्रिकेटप्रती आपल्याला खेळाडूंची आवड कायम ठेवायची असल्यास, त्यांच्या मानधनामध्ये वाढ करणे गरजेचे आहे.’ (वृत्तसंस्था)