डॉन ब्रॅडमन यांचा हा विक्रम विराट कोहली मोडणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 22:21 IST2016-05-19T20:25:53+5:302016-05-19T22:21:22+5:30
आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर सध्या रनमशीन बनलेल्या विराट कोहलीला आता ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन यांचा एकाच मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम खुणावत आहे

डॉन ब्रॅडमन यांचा हा विक्रम विराट कोहली मोडणार ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ : आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर सध्या रनमशीन बनलेल्या विराट कोहलीला आता ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर सर डॉन ब्रॅडमन यांचा एकाच मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम खुणावत आहे.
आयपीएलच्या नवव्या मोसमात कोहली आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून, याआधीच त्याने स्पर्धेत एकाच मोसमात सर्वाधिक धावांचा ख्रिस गेल व मायकल हसी यांचा विक्रम मोडला आहे. या दोघांनी प्रत्येकी ७३३ धावा काढल्या होत्या. या विक्रमाला गवसणी घातल्यानंतर कोहलीचा प्रयत्न ब्रॅडमन यांच्या विक्रमाला मागे टाकण्याचा असेल. १९३० साली झालेल्या अॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी ९७४ धावा चोपल्या होत्या.
ब्रॅडमन यांनी त्यावेळी पाच सामन्यांत १३९.१४ च्या जबरदस्त सरासरीच्या जोरावर चार शतके झळकावली होती. त्याचप्रमाणे एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा विचार केल्यास आॅस्टे्रलियाच्या ग्रेग चॅपल यांनी १९८१-८२ साली बेन्सन अॅण्ड हेजेस वर्ल्ड सिरीजमध्ये १४ सामन्यांतून ६८.८०च्या सरासरीने ८६८ धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक व ५ अर्धशतकांचा समावेश आहे.
एकूणच, सध्याचा कोहलीचा फॉर्म पाहता तो ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर नक्कीच आहे. त्याने १३ सामन्यांतून ८६.५०च्या सरासरीने ८६५ धावा कुटल्या असून, यामध्ये विक्रमी चार शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. अजून कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा एक साखळी सामना शिल्लक असून, जर बँगलोरने प्ले आॅफमध्ये प्रवेश केला, तर कोहली नक्कीच ब्रॅडमन यांचा विक्रम मागे टाकू शकतो.