मुंबईचे पहिल्या दिवसावर वर्चस्व

By Admin | Updated: February 7, 2015 01:36 IST2015-02-07T01:36:19+5:302015-02-07T01:36:19+5:30

रणजी करंडक स्पर्धेतील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असलेल्या मुंबईने गुरुवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या लढतीत झोकात सुरुवात केली.

Dominate the first day of Mumbai | मुंबईचे पहिल्या दिवसावर वर्चस्व

मुंबईचे पहिल्या दिवसावर वर्चस्व

मुंबई : रणजी करंडक स्पर्धेतील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत असलेल्या मुंबईने गुरुवारपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू झालेल्या लढतीत झोकात सुरुवात केली. कर्णधार आदित्य तरे, सिद्धेश लाड व निखिल पाटील या त्रिकूटाने कर्नाटकच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर देत दिवसअखेर यजमानांना ५ बाद ३४२ धावांची मजल मारून दिली. लाड (९४) आणि पाटील (८५) नाबाद असल्यामुळे मुंबईला धावांचा डोंगर उभा करण्याची संधी आहे.
४० वेळा रणजी करंडक पटकावणाऱ्या मुंबईला यंदा साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यात घरच्या मैदानावरील कामगिरी पाहता कर्नाटकविरुद्ध त्यांचा चांगलाच कस लागेल हे निश्चित होते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत मुंबईचा कर्णधार आदित्य तरे याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. पहिल्याच षटकात सलामीवीर श्रीदीप मंगेला याला विनय कुमारने बाद करून यजमानांना जबरदस्त धक्का दिला. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर याने तरेसह दुसऱ्या विकेटसाठी संयमी खेळी करून संघाला सावरले. दोन्ही खेळाडू सेट झालेले वाटत असतानाच विनय कुमारने अय्यरला बाद करून ४९ धावांची भागीदारी संपुष्टात आणली.
नेतृत्वाची जबाबदारी खांद्यावर पडल्यानंतर तरेची फलंदाजी आणखीनच बहरली. एका बाजूने संयमी खेळ करीत तरेने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने अभिषेक नायरसह तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करून संघाला शतकी पल्ला गाठून दिला, परंतु दुखापतीतून सावरलेल्या नायरला उदीत पटेलने माघारी धाडले. नायरच्या विकेटनंतर मुंबईला गळती लागली. सूर्यकुमार यादव पटेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. सेट झालेल्या तरेही ९२ चेंडूंत १५ चौकारांसह ७२ धावा करून श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे मुंबईचा डाव गडगडतो की काय, असा प्रश्न निर्माण झाला, परंतु सिद्धेश लाड व निखिल पाटील या जोडीने कर्नाटकच्या गोलंदाजांचा घामटा काढला. या जोडीने धावफलक हलता ठेवून मुंबईची सामन्यावरील पकड मजबूत केली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी ३९.५ षटकांत १७५ धावांची भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. लाडने ११९ चेंडूंत १८ चौकार मारून नाबाद ९४ धावा, तर पाटीलने १२९ चेंडूंत ११ चौकार व २ षटकार खेचून नाबाद ८५ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : मंगेला झे. उथप्पा गो. विनय ४, तरे झे. समर्थ गो. गोपाल ७२, अय्यर झे.गौतम गो. विनय २०, नायर झे. पांडे गो. पटेल ३६, यादव पायचीत गो. पटेल १९, लाड नाबाद ९४, पाटील नाबाद ८५.अवांतर - १२; एकूण - ९० षटकांत ५ बाद ३४२ धावा
गोलंदाज : विनय कुमार १७-४-६५-२, मिथुन १५-५-५२-०, गोपाल १४-१-७१-१, अरविंद २१-२-७३-०, पटेल २२-१-६८-२, समर्थ १-०-२-०.

अंतिम लढत मुंबईत
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर रणजी करंडक स्पर्धेची अंतिम लढत रंगणार असून, उपांत्य फेरीचे सामने कोलकाता व बंगळुरू येथे खेळविण्यात येणार असल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांकडून समजते. स्पर्धेची अंतिम लढत ८ ते १२ मार्च या कालावधीत होणार असून, उपांत्य फेरीच्या लढती २७ फेब्रुवारी ते १ मार्चला रंगतील. बीसीसीआयच्या माहितीनुसार उपांत्यपूर्व फेरीचे सामने कटक, इंदोर, लाहली आणि जयपूर येथे होतील.

Web Title: Dominate the first day of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.