हुल्लडबाजीला गांभीर्याने घेऊ नका - धोनी
By Admin | Updated: October 6, 2015 12:24 IST2015-10-06T12:24:59+5:302015-10-06T12:24:59+5:30
कटकमधील प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचा सर्वच स्तरातून निषेध दर्शवला जात असताना भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने या हुल्लडबाजीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे म्हटले आहे.
हुल्लडबाजीला गांभीर्याने घेऊ नका - धोनी
ऑनलाइन लोकमत
कटक, दि. ६ - भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीचा सर्वच स्तरातून निषेध दर्शवला जात असताना भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने या हुल्लडबाजीला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे म्हटले आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने हा प्रकार निंदनीय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
सोमवारी कटक येथील दुस-या टी - २० सामन्यात भारताच्या निराशाजनक कामगिरीमुळे नाराज प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये हुल्लडबाजी करत मैदानावर प्लास्टीकच्या बॉटल्स फेकल्या. या गोंधळामुळे सामना काही वेळ थांबवावा लागला होता. भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या या कृतीचा आता सर्वच स्तरातून निषेध होत आहे. मात्र कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मते या घटनांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ' आम्ही एकदा वायजेंग येथे सामना खेळत होतो, तिथेही भारत सामना जिंकत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या पाठिराख्यांनी मैदानावर बॉटल फेकल्या होत्या. सुरुवात एका बॉटलने झाली पण नंतर प्रेक्षकांना यात मजा येत होती अशी आठवणही धोनीने सांगितली. खेळाडूंच्या सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड झाली नव्हती असे त्याने स्पष्ट केले. टी -२० मालिकेत दुस-या सामन्यातील पराभवासाठी धोनीने फलंदाजांना जबाबदार धरले आहे. टी - २० सामन्यात डोकं लावून खेळण्यात उपयोग नाही हा अनुभव मी पुन्हा एकदा घेतला असेही धोनीने नमूद केले.
फाफ डू प्लेसिसने या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. मी गेली पाच वर्ष भारतात खेळलोय, पण अशी घटना पहिल्यांदाच घडली. ७२ दिवसांच्या भारत दौ-यात ही पहिली व शेवटची घटना असावी अशी आशाही त्याने व्यक्त केली. या घटना भारतातच नव्हे तर सगळीकडेच होत असतात, लोकांमध्ये खेळाप्रति एक जोश व उत्साह असतोच असे प्लेसिसने सांगितले.