जोकोविचची विजयी कूच

By Admin | Updated: July 4, 2015 01:49 IST2015-07-04T01:49:34+5:302015-07-04T01:49:34+5:30

सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आॅस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिंक याचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करीत आगेकूच केली.

Djokovic's victory march | जोकोविचची विजयी कूच

जोकोविचची विजयी कूच

लंडन : सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आॅस्ट्रेलियाच्या बर्नार्ड टॉमिंक याचा ६-३, ६-३, ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव करीत आगेकूच केली.
फ्रेंच ओपन चॅम्पियन स्टॅन वावरिंकाने आपली शानदार कामगिरी कायम ठेवताना स्पेनच्या फर्नांडो वर्डास्को याचा एक तास ५३ मिनिटे रंगलेल्या लढतीत ६-४, ६-३, ६-४ असा पराभव केला. त्याला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी बेल्जियमच्या डेव्हिड गोफिन याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.
वावरिंकाने अतिशय नियोजनबद्ध खेळ केला आणि प्रत्येक सेटमध्ये प्रत्येकी एका वेळेस प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस तोडताना सरळ सेटस्मध्ये आपला विजय निश्चित केला. वर्डास्कोलादेखील चार वेळेस ब्रेक पॉइंटची संधी मिळाली; परंतु स्वीस खेळाडूने प्रत्येक वेळी आपली सर्व्हिस वाचवण्यात यश मिळवले. तुलनेत वावरिंकाला सामन्यात १६ वेळेस ब्रेक पॉइंटची संधी मिळाली आणि त्यात तो तीन वेळेस यशस्वी ठरला.
वर्डास्कोचे त्याच्या सर्व्हिसवर नियंत्रण नव्हते, त्यामुळे वावरिंकाचे काम सोपे झाले. स्पॅनिश खेळाडूने एकूण १२ वेळेस दुहेरी चुका केल्या. वावरिंकाच्या धारदार सर्व्हिसचेही त्याच्याकडे उत्तर नव्हते. स्वीस खेळाडूने १४ वेळेस बिनतोड सर्व्हिस केल्या, तर वर्डास्कोला सहा वेळेस बिनतोड सर्व्हिस करता आली.
दरम्यान, २६ वा मानांकित निक किर्गियोसने तिसऱ्या फेरीत कॅनडाच्या राओनिक याचा ५-७, ७-५, ७-६, ६-३ असा पराभव केला. राओनिकने गेल्या वर्षी किर्गियोसला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते. किर्गियोसने या पराभवाचा हिशेब चुकता केला.
गेल्या वर्षी राफेल नदालला पराभूत करीत सनसनाटी निर्माण करणाऱ्या किर्गियोसची पुढील फेरीतील लढत २१ व्या मानांकित फ्रान्सच्या रिचर्ड गास्केटशी होईल.

Web Title: Djokovic's victory march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.