जोकोव्हिच विम्बल्डन प्रिन्स
By Admin | Updated: July 7, 2014 05:11 IST2014-07-07T05:11:36+5:302014-07-07T05:11:36+5:30
अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने वेगवान सर्व्हिस व जोरकस फटक्यांच्या जोरावर स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचे आठवे विजेतेपद पटकाविण्याचे स्वप्न भंग केले
जोकोव्हिच विम्बल्डन प्रिन्स
लंडन : अव्वल मानांकित नोव्हाक जोकोव्हिचने वेगवान सर्व्हिस व जोरकस फटक्यांच्या जोरावर स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचे आठवे विजेतेपद पटकाविण्याचे स्वप्न भंग केले आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे जेतेपद पटकाविले. पहिला सेट गमाविणाऱ्या जोकोव्हिचने दमदार पुनरागमन करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. जवळजवळ चार तास रंगलेल्या अंतिम लढतीत जोकोव्हिचने फेडररची झुंज ६-७, ६-४, ७-६, ५-७, ६-४ ने मोडून काढली.
पहिल्या सेटमध्ये उभय खेळाडूंनी संघर्षपूर्ण खेळ केला. फेडररने सर्व्ह व वॉलीवर नियंत्रण राखत वर्चस्व गाजविले. नवव्या गेममध्ये उभय खेळाडूंदरम्यान रॅली बघायला मिळाली. जोकोव्हिचची सर्व्हिस भेदक होती. त्याने पहिल्या चार सर्व्हिसमध्ये केवळ दोन गुण गमाविले आणि त्यातील एक गुण दुहेरी चूक केल्यामुळे गमवावा लागला. या सेटमध्ये उभय खेळाडू सर्व्हिस अभेद्य राखण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे टायब्रेकपर्यंत लांबलेल्या या सेटमध्ये अखेर फेडररने ९-७ ने बाजी मारली.
जोकोव्हिचने दुसऱ्या सेटमध्ये सर्व्हिसच्या जोरावर सुरुवातीपासून वर्चस्व गाजविले आणि सेट जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये पहिल्या सेटची पुनरावृत्ती झाली, पण टायब्रेकमध्ये जोकोव्हिचने ७-४ ने बाजी मारली. चौथ्या सेटमध्ये जोकोव्हिचकडे जेतेपद पटकाविण्याची सुवर्णसंधी होती. जोकोव्हिचने ५-२ अशी आघाडी मिळविली होती, पण लढवय्या फेडररने झुंजार खेळ केला आणि सलग पाच गेम जिंकत ७-५ ने सेटमध्ये सरशी साधली. दरम्यान, १० व्या गेममध्ये ३०-४० च्या स्कोअरवर जोकोव्हिचला सामना जिंंकला असे वाटले होते, पण फेडररने पंचाच्या निर्णयाला आव्हान दिले. चेंडू रेषेवर पडल्याचे स्पष्ट झाले. पाचव्या व निर्णायक सेटमध्ये उभय खेळाडूंमध्ये चुरस बघायला मिळाली, अखेर जोकोव्हिच फेडररची सर्व्हिस भेदण्यात यशस्वी ठरला. (वृत्तसंस्था)