जोकोविच, वावरिन्का, सेरेना सुसाट

By Admin | Updated: January 23, 2015 01:16 IST2015-01-23T01:16:55+5:302015-01-23T01:16:55+5:30

महिला गटातील अव्वल मानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये आपले विजयी अभियान कायम राखताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला़

Djokovic, Wawrinka, Serena Suasat | जोकोविच, वावरिन्का, सेरेना सुसाट

जोकोविच, वावरिन्का, सेरेना सुसाट

मेलबोर्न : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच, गत चॅम्पियन स्वित्झर्लंडचा स्टेनिसलास वावरिन्का, महिला गटातील अव्वल मानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये आपले विजयी अभियान कायम राखताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला़
पुरुष गटातील किताबाचा प्रबळ दावेदार जोकोविच याने एकेरीच्या दुसऱ्या फेरीत २ तास आणि २४ मिनिटे चाललेल्या सामन्यात रशियाच्या आंद्रे कुजनेत्सोव्हावर ६-०, ६-१, ६-४ अशा फरकाने विजय मिळवून पुढच्या फेरीत प्रवेश केला़
गत चॅम्पियन वावरिन्काने २ तास आणि १६ मिनिटे रंगलेल्या लढतीत रुमानियाच्या मेरियस कोपीलचा ७-६, ७-६, ६-३ असा फडशा पाडून तिसऱ्या फेरीत आपला प्रवेश निश्चित केला़ २९ वर्षीय वावरिन्का याने लढतीदरम्यान दुखापत झाल्यानंतरही हार न मानता सामन्यात बाजी मारली़ पुरुष गटातील अन्य लढतीत जपानच्या केई निशिकोरीने क्रोएशियाच्या इवान डोडिगचे आव्हान ४-६, ७-५, ६-२, ७-६ असे मोडून काढले़
महिला गटातील एकेरी सामन्यात सेरेना विल्यम्स हिने रशियाच्या वेरा ज्वोनारेव्हाला ७-५, ६-० अशा फरकाने धूळ चारली़ १ तास आणि २५ मिनिटे चाललेल्या या लढतीत सेरेनाने आपले वर्चस्व राखताना वेराला तोंड वर करण्याची संधीच दिली नाही़ तिसऱ्या फेरीत सेरेनाला स्पेनच्या गार्बाईन मुगुरुजा हिचा सामना करावा लागणार आहे़ मुगुरुजा हिने दुसऱ्या फेरीच्या सामन्यात स्लोव्हाकियाच्या डॅनियला हंतुचोव्हावर ६-१, ०-६, ६-१ अशी मात केली़ अन्य सामन्यात व्हीनस विल्यम्स हिने आपल्याच देशाच्या लॉरेन डेव्हिस हिच्यावर सरळ सेटमध्ये ६-२ आणि ६-३ने शानदार विजय मिळविला आणि तिसऱ्या फेरीत मजल मारली़ पोलंडच्या एग्निस्का रंदवास्का हिने स्वीडनच्या योहाना लॉर्सनवर ६-०, ६-१ ने विजय मिळविला़ (वृत्तसंस्था)

बोपण्णा दुसऱ्या फेरीत, भूपती पराभूत
मेलबोर्न : भारताच्या रोहन बोपण्णा याने कॅनडाच्या डॉनियल नेस्टरसह आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुहेरीत शानदार विजय मिळवून दुसऱ्या
फेरीत प्रवेश केला; मात्र, भारताच्या महेश भूपतीला आॅस्ट्रियाच्या जर्गन मेल्जरसह पुरुष गटातील दुहेरीच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला़

बोपण्णा आणि नेस्टर यांनी मार्कोस बगदातीस आणि मारिंका मातोसेविच या जोडीवर ७-६, ७-५ अशी मात केली़ बोपण्णा आणि नेस्टरला आता पुढच्या फेरीत स्पेनच्या फेलिसियानो लोपेज आणि बेलारूसचा मॅक्स मिरनी यांचा सामना करावा लागणार आहे़ भूपती आणि मेल्जर यांना अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्त्जमॅन आणि होरासियो जेबालोस या जोडीकडून ४-६, ३-६ अशी मात खावी लागली़

नदाल, जोकोविचकडून
स्मीजॅकचे कौतुक
४मेलबोर्न : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोविच यांनी अमेरिकेचा युवा टेनिसपटू टीम स्मीजॅक याचे कौतुक केले आहे.
४स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत नदालला स्मीजॅकविरुद्ध विजय मिळविण्यासाठी तब्बल ४ तासांहून अधिक वेळ वाट पाहावी लागली़ हा सामना ५ सेटपर्यंत रंगला होता़
४नदाल म्हणाला, स्मीजॅक याने उत्कृष्ट खेळ केला, याबद्दल तो कौतुकास पात्र आहे़ या सामन्याचा निकाल त्याच्या बाजूनेही लागला असता़ जोकोविच म्हणाला, नदालविरुद्धच्या सामन्यात स्मीजॅक याने केलेल्या खेळाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे़ या खेळाडूंचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे़

Web Title: Djokovic, Wawrinka, Serena Suasat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.