जोकोविच, सेरेनाचा धमाकेदार खेळ
By Admin | Updated: August 30, 2014 04:06 IST2014-08-30T04:06:37+5:302014-08-30T04:06:37+5:30
यूएस ओपन : अॅँडी मरेकडून मॅथियास बाकिंगर पराभूत

जोकोविच, सेरेनाचा धमाकेदार खेळ
न्यूयॉर्क : टॉप सीडेड नोव्हाक जोकोविच आणि सेरेना विल्यम्स यांनी यूएस ओपन टेनिस स्पर्धेत दुसऱ्या फेरीतील आपापले सामने जिंकत तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याने फ्रान्सच्या पॉल हेन्री मॅथ्यू याला ६-१, ६-३, ६-0 असे एकतर्फी हरवून दुसऱ्या फेरीचा सामना जिंकला. महिला गटात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला आपल्याच देशाच्या वानिया किंग याला सलग सेटमध्ये ६-१, ६-0 असे हरविण्यास फारसे कष्ट पडले नाहीत.
पुरुष गटात अन्य सामन्यात आठवे मानांकनप्राप्त आणि माजी विजेता ब्रिटनच्या अँडी मरे याने जर्मनीच्या मॅथियास बाकिंगर याला पराभूत केले. प्रेक्षकांचा अत्यंत कमी प्रतिसाद लाभलेल्या या सामन्यात मरेने ६-३, ६-३, ६-४ असे सहज हरविले. त्याच्याशिवाय विल्फ्रेड त्सोंगा, मिलोस राओनिक आणि के केई निशिकोरी यांनीही पुरुष एकेरीचे दुसऱ्या फेरीचे सामने जिंकले आहेत.
महिला एकेरीच्या अन्य सामन्यात विम्बल्डन चॅम्पियन चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा क्विटोव्हाने अपेक्षेनुरूप कामगिरी करताना तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. दुसऱ्या फेरीतील सामन्यात तिने आपल्याच देशाच्या पेत्रा सेटोवस्काचे आव्हान ६-४, ६-२ असे निपटून काढले. सातव्या मानांकनप्राप्त कॅनडाच्या इयुजिनी बुकार्डने सलग चौथ्या ग्रँड स्लॅमच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी जोरदार कूच करीत रोमानियाच्या सोराना कर्स्टिया हिला ६-२, ६-७, ६-४ असे हरविले.
बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने अमेरिकेच्या ख्रिस्तिना मॅकहेल हिला ६-३, ६-२ असे हरविले. सर्बियाच्या अॅना इव्हानोविक हिने आॅस्ट्रेलियाच्या सामंथा स्तोसूर हिला हरविले.
या स्पर्धेत अँडी मरे यासारख्या वरिष्ठ खेळाडूच्या सामन्याला खुर्च्या ओस पडल्या होत्या; पण अमेरिकेची उगवती टेनिस स्टार १५ वर्षीय बेलिसचा सामना पाहण्यास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. स्टेडियमच्या आत आणि बाहेर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनसमोरही गर्दी दिसत होती; परंतु गेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियन ओपनची उपविजेती डोमनिका सिबुलकोव्हा हिला पराभूत करणारी बेलिस आज आपला करिष्मा दाखवू शकली नाही. कझाकिस्तानच्या झरिना डियासने संघर्षपूर्ण सामन्यात ६-३, 0-६, ६-२ असा बेलिसचा पराभव केला. (वृत्तसंस्था)