जोकोविच, मरे उपांत्य फेरीत
By Admin | Updated: November 8, 2015 03:09 IST2015-11-08T03:09:42+5:302015-11-08T03:09:42+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकित अँडी मरे यांनी आपापल्या लढती जिंकताना पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश

जोकोविच, मरे उपांत्य फेरीत
पॅरिस : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकित अँडी मरे यांनी आपापल्या लढती जिंकताना पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. तथापि, स्पेनच्या राफेल नदाल याला स्टेनिसलास वावरिंका याच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.
सर्बियाच्या जोकोविचने पाचव्या मानांकित टॉमस बेर्डीचला पराभूत करीत आपला सलग २0 वा विजय मिळविला. जोकोविचने या लढतीत ७-६, ७-६ असा विजय मिळवित अंतिम चारमध्ये प्रवेश मिळविला. तेथे त्याचा सामना स्वित्झर्लंडच्या स्टेन वावरिंका याच्याविरुद्ध होईल.
जागतिक क्रमवारीतील चौथ्या मानांकित वावरिंका याने स्पेनच्या नदाल याचा ७-६, ७-६ असा पराभव केला. दोन्ही खेळाडूंतील लढत काट्याची ठरली. त्यात अखेर वावरिंका याने बाजी मारली.
दुसरीकडे अँडी मरे याने तीन सेटपर्यंत रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रिचर्ड गास्के याचा ७-६, ३-६, ६-३ असा पराभव केला. पहिला सेट टायब्रेकरपर्यंत खेचला गेला होता. त्यात मरेने ९-७ असा विजय मिळवला. त्यानंतर गास्केने दुसरा सेट जिंकताना या सामन्यातील चुरस वाढवली. अंतिम चारमध्ये मरे याचा सामना स्पेनच्या डेव्हिड फेरर याच्याविरुद्ध होईल. फेरर याने अमेरिकेच्या जॉन इस्नर याच्यावर ६-३, ६-७, ६-२ असा विजय मिळवीत पुढील फेरीतील प्रवेश निश्चित केला.