जोकोविच, मरे दुस-या फेरीत
By Admin | Updated: August 27, 2014 04:00 IST2014-08-27T04:00:40+5:302014-08-27T04:00:40+5:30
पुरुष एकेरी सामन्यात जोकोविचने लौकिकास साजेसा खेळ करताना अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्त्जमॅन याच्यावर ६-१, ६-२, ६-४ अशा फरकाने विजय मिळवून पुढची फेरी गाठली़

जोकोविच, मरे दुस-या फेरीत
न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच, ब्रिटनचा अँडी मरे, रशियन टेनिस सुंदरी मारिया शारापोव्हा आणि अमेरिकेची व्हिनस विल्यम्स यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत शानदार विजय मिळवून आगेकूच केली़
पुरुष एकेरी सामन्यात जोकोविचने लौकिकास साजेसा खेळ करताना अर्जेंटिनाच्या दिएगो श्वार्त्जमॅन याच्यावर ६-१, ६-२, ६-४ अशा फरकाने विजय मिळवून पुढची फेरी गाठली़ ब्रिटनच्या मरेने जागतिक क्रमवारीत ७०व्या स्थानावर असलेल्या नेदरलँडच्या रॉबिन हॉसवर चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात ६-३, ७-६, १-६, ७-५ अशी मात करीत पुढच्या फेरीत प्रवेश मिळविला़
स्पर्धेच्या किताबाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा जोकोविच विवाहानंतर हार्डकोर्टवर केवळ दोनच सामने जिंकला आहे़ मात्र स्पर्धेच्या पहिल्या फेरीत हा खेळाडू चांगलाच फॉर्ममध्ये दिसला़ त्याने २२ वर्षी अर्जेंटिना विरुद्ध २४ विनर्स आणि सात एस लगावले़ सामन्यानंतर जोकोविच म्हणाला, या प्रतिष्ठित स्पर्धेत विजयी सुरुवात केली याचा आनंद आहे़ यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न राहील़
अन्य सामन्यात आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने झेक प्रजासत्ताकच्या जिरी वेसलेचा ६-२, ७-६, ७-६ असा पराभव करीत दुसऱ्या फेरीत मजल मारली़ कॅनडाच्या मिलोस राओनिकने जपानच्या क्वालिफायर तारो डॅनियलचा ६-३, ६-२, ७-६ असा फडशा पाडत आगेकूच केली़ फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाने अन्य सामन्यात अर्जेंटिनाच्या जुआन मानोकोला ६-३, ४-६, ७-६, ६-१ अशा फरकाने धूळ चारली़
दुसरीकडे महिला एकेरी लढतीत रशियाची आघाडीची टेनिसपटू मारिया शारापोव्हाने आपल्याच देशाच्या मारिया किरीलेंकोवर ६-४, ६-० अशी सहज मात करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, तर अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सने पहिला सेट गमावूनही सामन्यात जोरदार मुसंडी मारली़ त्यानंतर या सामन्यात २-६, ६-३, ६-३ अशी सरशी साधली़
अन्य लढतीत सर्बियाच्या येलेना यांकोविचने आपल्या देशाच्या बोजाना जोवानोवस्कीचे आव्हान ६-२, ६-३ असे मोडून काढले, तर इटलीच्या सारा इराणीने बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेसवर ६-१, ७-५ असा विजय मिळवून स्पर्धेत आगेकूच केली़ (वृत्तसंस्था)