जोकोविच, फेडरर कोट्यधीशाच्या ‘कोर्टात’
By Admin | Updated: December 27, 2015 02:32 IST2015-12-27T02:32:15+5:302015-12-27T02:32:15+5:30
नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर २०१६ मध्ये टेनिस इतिहासात १० कोटी डॉलरची कमाई करणारे पहिले पुरुष टेनिसपटू ठरू शकतात.

जोकोविच, फेडरर कोट्यधीशाच्या ‘कोर्टात’
पॅरिस : नोव्हाक जोकोविच आणि रॉजर फेडरर २०१६ मध्ये टेनिस इतिहासात १० कोटी डॉलरची कमाई करणारे पहिले पुरुष टेनिसपटू ठरू शकतात.
टेनिस इतिहासात कोणताही खेळाडू कोर्टपासून मिळणाऱ्या उत्पन्नासंबंधी १० कोटी डॉलरच्या आकड्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही; परंतु जागतिक क्रमवारीतील नंबर वन जोकोविच आणि तृतीय मानांकित फेडरर या वर्षी ही किमया साधू शकतात. आतापर्यंत २८ वर्षीय जोकोविचची बक्षिसाची रक्कम ९ कोटी ४० लाख डॉलरपेक्षा जास्त आहे, तर त्याच्यापेक्षा ६ वर्षांनी सिनियर असणाऱ्या फेडररच्या नावावर ९ कोटी ७३ लाख बक्षिसाची रक्कम आहे.
जानेवारीत वर्षाच्या पहिल्या ग्रँडस्लॅम आॅस्ट्रेलिया ओपनच्या विजेत्यास ३८ लाख ५० हजार डॉलर रक्कम मिळणार आहे आणि फेडररने जर ही स्पर्धा जिंकली, तर तो १० कोटी डॉलरचा आकडा गाठेल.
एका वर्षात सर्वाधिक उत्पन्न मिळवण्याचा विक्रम जोकोविचच्या नावावर आहे. त्याने २०१५मध्ये बक्षिसाच्या रकमेद्वारे १.२५ कोटींची कमाई केली होती आणि त्यादरम्यान चारपैकी ३ ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावले होते.
जोकोविच म्हणाला, ‘‘हे वर्ष माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. त्यामुळे पुढे जाण्यासाठी मला प्रेरणा मिळाली आहे आणि पुढील वर्षीही शानदार कामगिरी करेन, अशी मला आशा आहे.’’ फोर्ब्सच्या यादीनुसार फेडरर या वर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळविणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)