‘जीवनगौरव’ पुरस्कारांबाबत नाराजी

By Admin | Updated: October 24, 2015 04:18 IST2015-10-24T04:18:57+5:302015-10-24T04:18:57+5:30

सरकारी पुरस्कार म्हटले की तो देण्यात येणाऱ्या व्यक्तीची निवड योग्य की अयोग्य, याबाबत वाद होणे हे जणू ठरलेलेच असते. राज्य सरकारच्या क्रीडा पुरस्कारांबाबत तर हा नियमच

Displeasure about the 'life expectancy' award | ‘जीवनगौरव’ पुरस्कारांबाबत नाराजी

‘जीवनगौरव’ पुरस्कारांबाबत नाराजी

पुणे : सरकारी पुरस्कार म्हटले की तो देण्यात येणाऱ्या व्यक्तीची निवड योग्य की अयोग्य, याबाबत वाद होणे हे जणू ठरलेलेच असते. राज्य सरकारच्या क्रीडा पुरस्कारांबाबत तर हा नियमच झाला आहे, असे वाटण्याइतपत सातत्याने वाद होत असतात. अलीकडेच जाहीर झालेल्या शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कारांबद्दलही असेच झाले आहे. या पुरस्कारांबाबत सरकारचा प्राधान्यक्रम चुकल्यावरून नाराजी व्यक्त होत आहे.
अनेक वर्षांपासून राज्याच्या क्रीडा पुरस्कारांचे भिजत घोंगडे पडून होते. क्रीडा मंत्रालयाने मागील वर्षी ३ वर्षांचे शिवछत्रपती पुरस्कार दिले. २०१२-१३ आणि २०१३-१४ असे २ वर्षांचे पुरस्कार यंदा नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यासाठी पुण्याचे रमेश विपट आणि लातूरचे गणपत माने यांची निवड झाली. यंदा जीवनगौरव पुरस्कारांच्या संदर्भात शासनाचा प्राधान्यक्रम चुकला असून अनेक पात्र व्यक्तींना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘‘ज्या व्यक्तींना जीवनगौरव जाहीर झाला आहे, त्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. मुद्दा आहे तो प्राधान्यक्रमाचा. क्रीडाक्षेत्रात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या अनेक वरिष्ठांना यावेळी डावलले,’’ अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर व्यक्त केली.
क्रीडा संघटक पुरस्कारासाठीही अनेक पात्र संघटकांना डावलल्याची चर्चा आहे. अनेक चमकदार खेळाडू घडवणारे, गरीब खेळाडूंना विनामूल्य प्रशिक्षण देणारे कबड्डी प्रशिक्षक अनंत शेळके, वेटलिफ्टिंग खेळासाठी महत्वाचे योगदान देणारे राज गुलाटी, राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव प्रकाश तुळपुळे यांना यंदा पुरस्कार अपेक्षित होते.
सरकारने जीजामाता पुरस्कारासाठी केवळ वर्ध्याच्या प्रा. डॉ. नंदिनी बोंगाडे यांचेच एकमेव नाव जाहीर केले. क्रीडा क्षेत्रातील योगदान बघता महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील राष्ट्रीय विक्रम नोंदविणाऱ्या माजी आशियाई आणि आॅलिम्पिक खेळाडू अणि प्रशिक्षक रचिता मिस्त्री, रायफल संघटनेच्या पदाधिकारी शीला कानुगो यांनाही जिजामाता पुरस्कार अपेक्षित होता. खेळाडूंच्या पुरस्कारांमध्येही अनेक नावे हुकल्याची चर्चा आहे.
(क्रीडा प्रतिनिधी)

योगदानापेक्षा विचारसरणी महत्त्वाची?
क्रीडा पुरस्कार हे या क्षेत्रातील योगदान ध्यानात घेऊन दिले जातात. मात्र, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असलेल्या वा त्याच्या विचारांशी जवळीक असलेल्यांना बहुतांश पुरस्कार देण्यात यावेत, अशी भूमिका क्रीडामंत्री विनोद तावडे यांची आहे. यामुळे अनेक पात्र व्यक्तींची पुरस्कारांसाठी निवड होऊ शकली नाही, अशी धक्कादायक माहिती पुरस्कार निवड समितीतील एका सदस्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिली.

मागील वर्षी २००९-१०, २०१०-११, २०११-१२ असे
३ वर्षांचे पुरस्कार एकाच वेळी दिल्या गेले. त्यात
एकाच विभागामधील एकापेक्षा जास्त व्यक्ती नको, म्हणून भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष
प्रल्हाद सावंत यांचा जीवगौरव पुरस्कार हुकल्याची
चर्चा होती. मागील वर्षी हुकलेला जीवनगौरव पुरस्कार त्यांना यंदा मिळेल, अशी अपेक्षा असताना यंदा
जाहीर झालेल्या २ वर्षांच्या पुरस्कारविजेत्यांमध्ये त्यांचे नाव नाही.
सावंत यांच्यासह कुस्ती आणि हॅण्डबॉल या खेळात मोठे योगदान देणारे नागपूरचे सीताराम भोतमांगे तसेच व्हॉलीबॉलच्या विकासासाठी झटणारे सोलापूरचे वीरभद्र रिगल यांचे काम बघता जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांना प्राधान्य मिळायला हवे होते. सरकारचा हा क्रम चुकला, असा सूर क्रीडा क्षेत्रातून उमटत आहे.

जीवनगौरव पुरस्कारासाठी मी स्वत:हून अर्ज पाठवला नव्हता. ज्यांनी यासाठी माझे नाव पाठवले आणि ज्यांनी नाकारले त्या सर्वांना धन्यवाद.
- प्रल्हाद सावंत, उपाध्यक्ष भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटना

Web Title: Displeasure about the 'life expectancy' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.