श्रीकांत, सायनाचा ‘चायना’त डंका
By Admin | Updated: November 17, 2014 01:48 IST2014-11-17T01:48:05+5:302014-11-17T01:48:05+5:30
सायनाचे कारकिर्दीतील हे आठवे सुपर सीरिज विजेतेपद आहे. श्रीकांतने धक्कादायक निकालाची नोंद केली

श्रीकांत, सायनाचा ‘चायना’त डंका
फुजोऊ : आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल व युवा स्टार श्रीकांत यांनी आज, रविवारी चायना ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीत अजिंक्यपद पटकाविताना भारतीय बॅडमिंटनमध्ये नवा इतिहास रचला. सुपर सीरिज स्पर्धेत प्रथम भारतीय खेळाडूंनी दोन्ही गटांत (महिला व पुरुष एकेरी) विजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला. सुपर सीरिज व प्रीमियर स्पर्धांना प्रारंभ झाल्यानंतर भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूने प्रथमच सुपर सीरिज स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहाव्यांदा सहभागी होताना जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सायनाने हॅक्सिया आॅलिम्पिक स्पोर्ट सेंटरमध्ये महिला एकेरीच्या अंतिम लढतीत जपानच्या १७ वर्षीय अकेनी यामागुची हिचा ४२ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१२, २२-२० ने पराभव केला. सायनाचे कारकिर्दीतील हे आठवे सुपर सीरिज विजेतेपद आहे.
श्रीकांतने धक्कादायक निकालाची नोंद केली. श्रीकांतने दोनवेळा आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता व पाच वेळा विश्व चॅम्पियनचा मान मिळविणारा चीनचा बॅडमिंटनपटू लीन डॅनचा २१-१९, २१-१७ ने पराभव केला. पुरुष एकेरीची अंतिम लढत ४६ मिनिटे रंगली. श्रीकांतचे हे कारकिर्दीतील पहिले सुपर सीरिज विजेतेपद आहे.
अंतिम लढतीत श्रीकांतने सुरुवातीला ११-७ अशी आघाडी मिळविली होती; पण लीनने चमकदार कामगिरी करीत ११-१० अशी पिछाडी भरून काढली. ३१ वर्षीय स्टार चीन बॅडमिंटनपटूने फटक्यांवर नियंत्रण राखत शानदार खेळ केला; पण भारतीय खेळाडूने नेटजवळ चमकदार कामगिरी करीत वर्चस्व गाजविले. श्रीकांतच्या ड्रिबल व जोसकस स्मॅशचे लीनकडे उत्तर नव्हते. श्रीकांतने त्यानंतर १४-१२ अशी आघाडी घेतली.
लीनने त्यानंतर अनुभवाच्या जोरावर गुण वसूल करीत १९-१७ अशी आघाडी घेतली. श्रीकांतने दडपण न बाळगता दोन गुण वसूल करीत बरोबरी साधली. त्यानंतर रेफरलचा एक निर्णय श्रीकांतच्या बाजूने लागला. श्रीकांतने जोरकस स्मॅशवर गुण वसूल करीत पहिला गेम जिंकला.
दुसरा गेममध्ये अशीच जुगलबंदी अनुभवाला मिळाली. सुरुवातीला उभय खेळाडूंदरम्यान ८-८ अशी बरोबरी होती त्यानंतर लिनने मध्यंतरापर्यंत ११-९ अशी आघाडी घेतली. श्रीकांतने आक्रमक खेळ करीत १२-१२ अशी बरोबरी साधली. उभय खेळाडूंमध्ये नंतर १५-१५ अशी बरोबरी होती.
श्रीकांतने त्यानंतर थोड्या गुणांची आघाडी घेतली होती. आंध्र प्रदेशच्या या २१ वर्षीय खेळाडूंने सलग चार गुण वसूल करीत वर्चस्व गाजविले. लीनने एक मॅच पॉर्इंटचा बचाव केला; पण श्रीकांतने त्यानंतर गुण वसूल करीत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
गेल्या वर्षी थायलंड ओपन ग्रांप्रिमध्ये जेतेपद पटकाविणाऱ्या श्रीकांतला यंदा इंडिया ओपन ग्रांप्रमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मलेशियन ओपनमध्ये श्रीकांतला उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. श्रीकांतने ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र दुहेरीत उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
त्याआधी, सायनाने सुरुवातीला भारतीय चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. तिने सहाव्या प्रयत्नात प्रथमच चायना ओपनचे जेतेपद पटकाविले.
पहिल्या गेममध्ये सुरुवातीला ३-१ अशी आघाडी घेणाऱ्या सायनाने त्यानंतर ८-४ अशी आघाडी घेतली. सायनाने काही टाळण्याजोग्या चुका केल्यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला गुण मिळविता आले. मध्यंतराला सायनाकडे चार गुणांची आघाडी होती. मध्यंतरानंतर सायनाने खेळावर नियंत्रण राखताना आपल्या युवा प्रतिस्पर्धी खेळाडूला चुका करण्यास भाग पाडले. त्यामुळे सायनाने १४-७ अशी भक्कम आघाडी घेतली. अकेनीने काही चमकदार स्मॅश लगाविले, पण सायनाची एकाग्रता भंग करण्यास तिचे प्रयत्न अपुरेच पडले. सायनाने शानदार रिटर्नवर गुण वसूल करीत पहिल्या गेममध्ये बाजी मारली.
अकेनीने दुसऱ्या गेममध्ये संघर्षपूर्ण खेळ केला. ब्रेकदरम्यान अकेनीने ११-९ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या गेममध्ये अखेरच्या क्षणी उभय खेळाडूंदरम्यान चुरस अनुभवाला मिळाली. दोन्ही खेळाडूंदरम्यान रॅली बघायला मिळाल्या, पण अनुभवी सायनाने अखेर १४-१४ अशी बरोबीर साधली. सायनाने जोरकस स्मॅश लगाविले, पण प्रतिस्पर्धी खेळाडूच्या उणिवा शोधण्यात मात्र अपयशी ठरली. सायनाच्या जोरकस फटक्यावर अकेनीने जोरदार प्रत्युत्तर दिले. उभय खेळाडूंदरम्यान १८-१८ अशी बरोबरी असताना सायनाने नेटलगतच्या फटक्यावर एक गुण वसूल केला. त्यानंतरचा सायनाने सलग दोन गुण गमाविले. त्यामुळे अकेनीने २०-१९ अशी आघाडी घेतली होती. युवा अकेनीचे त्यानंतर दोन शॉट कोर्टबाहेर पडल्यामुळे सायनाचा विजेतेपदाचा मार्ग प्रशस्त झाला.
सायनाचे या वर्षातील हे तिसरे विजेतेपद आहे. सायनाने जूनमध्ये आॅस्ट्रेलियन सुपर सीरिज व वर्षाच्या सुरुवातीला सैयद मोदी आंतरराष्ट्रीय ग्रांप्रि गोल्डचे विजेतेपद पटकाविले होते. सायनाचे कारकीर्दीतील हे आठवे प्रीमिअर सुपर सीरिज विजेतेपद आहे. (वृत्तसंस्था)