धोनी सेनेचा ‘रॉयल’ विजय
By Admin | Updated: April 23, 2015 02:58 IST2015-04-23T02:58:19+5:302015-04-23T02:58:19+5:30
सुरेश रैनाचे (३२ चेंडूंत ६२) आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर आशिष नेहराची भेदक गोलंदाजी (४ बळी) यांच्या जोरावर धोनी सेनेने विराट

धोनी सेनेचा ‘रॉयल’ विजय
बंगळूरु : सुरेश रैनाचे (३२ चेंडूंत ६२) आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर आशिष नेहराची भेदक गोलंदाजी (४ बळी) यांच्या जोरावर धोनी सेनेने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर २७ धावांनी मात केली. आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा हा चौथा विजय ठरला. चेन्नईच्या १८१ धावांचा पाठलाग करणाऱ्या बंगळुरूला ८ बाद १५४ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. विराटची अर्धशतकी (५१) खेळी व्यर्थ ठरली. तर दुसरीकडे, स्पर्धेत आतापर्यंत १० बळी मिळवणारा नेहरा आता सर्वाधिक बळींच्या यादीत अव्वल स्थानावर पोहचला.
मणविंदर बिस्ला (१७) आणि रोसो या जोडीने बंगळुरूसाठी संथ सुरुवात केली. त्यांनी ३१ धावांची भागीदारी केली. बिस्ला बाद झाल्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी बंगळुरूच्या फलंदाजांना जखडून ठेवले. अशिष नेहाराने रोसोचा (१४) त्रिफळा उडवत बंगळुरूला धक्का दिला. दिनेश कार्तिक (१०), डिव्हिलियर्स (१४), एस खान (१४) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे बंगळुरूची अवस्था १३.३ षटकांत ५ बाद ९७ अशी झाली होती. एका बाजूने संघर्ष करणाऱ्या विराट कोहलीने नंतर मात्र आक्रमक पवित्रा घेतला त्यावेळी मात्र प्रति षटक १५ धावा अशी संकटमय स्थिती होती. अशाच नेहराच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात कोहली बाद
झाला. सीमारेषेवर स्मिथने त्याचा
झेल टिपला. कोहलीने ४२ चेंडंूत ४ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ५१ धावा केल्या. तळात डेव्हिड वीजने २२ धावांचे योगदान दिले मात्र त्याचा हा प्रयत्नसुद्धा अपयशी ठरला. चेन्नईकडून नेहराने ४ तर पांडे, जडेजा आणि ब्राव्हो यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फिरकीपटू चहलने सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्याच षटकांत ब्रँडन मॅक्क्युलमचा मोठा अडथळा चहलने दूर केला. ब्रँडन रोसोकरवी अवघ्या ४ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर सलामीवीर स्मिथ आणि सुरेश रैना या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी केली. यामध्ये स्मिथने २९ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या. पटेलच्या चेंडूवर यष्टिरक्षक कार्तिककरवी तो झेलबाद झाला. त्यानंतर कर्णधार धोनीने क्रम बदलवत फलंदाजीसाठी येण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय इतका यशस्वी ठरला नाही. धोनीने १३ चेंडूंत १३ धावा केल्या.
दुसरीकडून मात्र, चेन्नईचे फलंदाज टप्याटप्याने बाद होत गेले. जडेजा (८), ब्राव्हो (५), आश्विन (५), मोहित शर्मा (२) हे सगळे फटके मारण्याचा नादात बाद झाले. रैना ६२ धावांवर बाद झाल्यानंतर ड्यु प्लेसिसने मोर्चा सांभाळला.(वृत्तसंस्था)