पुण्याची आशा धोनीच्या चमत्कारावर

By Admin | Updated: May 3, 2016 03:47 IST2016-05-03T03:47:53+5:302016-05-03T03:47:53+5:30

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक सफल कर्णधार, आयपीएलमधील उत्कृष्ट संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार अशी बिरुदावली गेली आठ वर्षे मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला

Dhoni's miracle of Pune hope | पुण्याची आशा धोनीच्या चमत्कारावर

पुण्याची आशा धोनीच्या चमत्कारावर

नवी दिल्ली : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक सफल कर्णधार, आयपीएलमधील उत्कृष्ट संघाचा सर्वोत्कृष्ट कर्णधार अशी बिरुदावली गेली आठ वर्षे मिरविणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला आयपीएलच्या नवव्या सत्रात मात्र आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचा नवा संघ रायझिंग पुणे सुपरजायंट्स खेळाडूंच्या दुखापती, खराब कामगिरी यामुळे पराभवाच्या गर्तेत सापडला आहे. या संघाला चेन्नई सुपरकिंग्जसारखे बलाढ्य करण्यात कर्णधार धोनीला यश येईल का, हा खरा प्रश्न आहे.
महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या आठ सत्रापर्यंत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार होता, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हा संघ आयपीएलमधून निलंबित करण्यात आला. पुणे आणि गुजरात हे दोन संघ यंदाच्या आयपीएलमध्ये नव्याने सामील करण्यात आले. यापैकी पुण्याची धुरा धोनीकडे, तर गुजरातची धुरा त्याचाच एकेकाळचा सहकारी सुरेश रैनाकडे आहे. रैना नवीन जबाबदारीत प्रचंड यशस्वी ठरताना दिसतोय, तर धोनी मात्र कमालीचा अयशस्वी होत आहे. आठ सामन्यांत दोन विजय आणि सहा पराजय हे त्याच्या नावापुढे शोभून दिसत नाहीत. आता या संघाला पुढे यायचे असेल तर एखाद्या चमत्काराचीच गरज आहे.
पुण्याच्या संघात धोनीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हीन पीटरसन, दक्षिण आफ्रिकेचा टष्ट्वेंटी-२० कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ असे आणि स्वत: धोनी असे चार-चार कप्तान होते, परंतु पुणे संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. केव्हीन पीटरसन दुखापतीमुळे संघातून पहिल्यांदा बाहेर पडला. त्यानंतर मिशेल मार्शही दुखापतग्रस्त झाला आणि आता डू प्लेसिस आणि स्मिथ हे दोघेही जायबंदी झाले आहेत. अशा परिस्थितीत धोनीपुढे मर्यादित मॅनपॉवरमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान असणार आहे.
पुणे संघाने स्पर्धेची सुरुवात धडाकेबाज केली होती. गतविजेत्या मुंबई इंडियन्सला त्यांनी ९ विकेट्सनी धुतले होते. (वृत्तसंस्था)
त्यानंतर मात्र त्यांचा पराभवाचा सिलसिला सुरू झाला, अपवाद फक्त हैदराबाद सनरायझर्सचा. या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार पुण्याला विजय मिळाला. आता धोनीचा संघ एक जरी सामना हरला, तर त्यांचा प्लेआॅफचा मार्ग खडतर होईल. आॅस्ट्रेलियावरील ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या, आशिया चषक विजेत्या आणि विश्वचषकात भारताला सेमी फायनलपर्यंत घेऊन जाणाऱ्या धोनीवर त्याचे नशीब असे रुसेल, याचा अंदाज कोणालाच आला नसेल, हे मात्र निश्चित! (वृत्तसंस्था)

Web Title: Dhoni's miracle of Pune hope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.