धोनी सेना ग्रीनपार्कमध्ये अपराजित
By Admin | Updated: October 10, 2015 05:34 IST2015-10-10T05:34:18+5:302015-10-10T05:34:18+5:30
ग्रीनपार्कचे हिरवळ असलेले मैदान भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी लकी ठरलेले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली येथे आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व, तिन्ही वन-डे सामन्यांत

धोनी सेना ग्रीनपार्कमध्ये अपराजित
कानपूर : ग्रीनपार्कचे हिरवळ असलेले मैदान भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीसाठी लकी ठरलेले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली येथे आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व, तिन्ही वन-डे सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळविला आहे.
भारतीय कर्णधार कानपूरमध्ये अभेद्य योद्धा मानल्या जातो; पण त्याआधी टी-२० मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २-० ने पराभव स्वीकारावा लागला, हे धोनीला विसरता येणार नाही. भारताला धरमशाला व कटकमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला, तर ईडन गार्डन्समध्ये पाऊस व मैदान खेळण्यायोग्य नसल्यामुळे तिसरी लढत रद्द झाली.
टी-२० मालिकेत पराभव स्वीकारावा लागला असला तरी ११ आॅक्टोबरपासून ग्रीनपार्कमध्ये प्रारंभ होत असलेल्या वन-डे सामन्यांच्या मालिकेत त्याचे मनोधैर्य उंचावलेले राहील, अशी आशा आहे. हे मैदान धोनीसाठी लकी असून टीम इंडिया मालिकेची विजायने सुरुवात करण्यास उत्सुक आहे.
कॅप्टन कुल ग्रीनपार्कमध्ये केवळ वन-डे सामन्यांतच यशस्वी ठरला असे नाही तर येथे धोनीच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या दोन कसोटी सामन्यांतही भारतीय संघाने विजयाची परंपरा कायम राखली. भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये गणल्या जाणाऱ्या धोनीने वन-डेमध्ये पदार्पण २३ डिसेंबर २००४ रोजी बांगलादेशविरुद्ध केले होते, पण ग्रीनपार्कच्या खेळपट्टीची ओळख त्याला १५ एप्रिल २००५ रोजी पाकिस्तानविरुद्धच्या वन-डे लढतीदरम्यान झाली. या लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता.
त्यानंतर ११ नोव्हेंबर २००७ मध्ये लांब केस असलेला धोनी या मैदानावर कर्णधार म्हणून दाखल झाला. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाचा ४६ धावांनी पराभव करीत यापूर्वीच्या पराभवाचा हिशेब चुकता केला. त्या दिवसापासून ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची विजयाची मोहीम आजतागायत कायम आहे.
नशिबवान धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००८ मध्ये येथे इंग्लंडविरुद्ध डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर पाच गडी राखून विजय मिळवला होता तर २७ नोव्हेंबर २०१३ मध्ये वेस्ट इंडीज संघाला भारताविरुद्ध पाच गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.
७ जुलै १९८१ रोजी तत्कालीन बिहारच्या (सध्याचे झारखंड) रांचीमध्ये जन्मलेल्या धोनीने या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केली. २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. त्या लढतीत आॅफ स्पिनर हरभजन सिंगने ग्रीनपार्कच्या खेळपट्टीवर वर्चस्व गाजवले. त्याने पहिल्या डावात तीन तर दुसऱ्या डावात चार बळी घेत भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला.
धोनीच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये भारताने येथे श्रीलंकेचा एक डाव १४४ धावांनी पराभव केला होता. त्या लढतीत गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी
शतके झळकावली होती. भारताने या लढतीत ६४२ धावांची दमदार मजल मारली आणि श्रीलंका संघाला गुडघे टेकवण्यास भाग पाडले. (वृत्तसंस्था)
वन-डे मालिका सोपी नाही : ड्युमिनी
दक्षिण आफ्रिका संघाने टी-२० सामन्यांच्या मालिकेत सहज विजय मिळविला असला, तरी त्यांचा स्टार फलंदाज जेपी ड्युमिनीच्या मते, आगामी वन-डे सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ दमदार पुनरागम करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ भारतीय संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही, असेही ड्युमिनी म्हणाला.
दक्षिण आफ्रिका संघाने धरमशाला व कटक येथे टी-२० सामन्यांत विजय मिळवून भारताचा मालिकेत २-० ने पराभव केला. तिसरा व अखेरचा सामना पावसामुळे रद्द झाला.
मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेला ड्युमिनी म्हणाला, ‘‘संघ म्हणून टीम इंडिया आगामी वन-डे व कसोटी मालिकांमध्ये चमकदार कामगिरी करेल, अशी आशा आहे. वन-डे सामन्यांची मालिका सोपी राहील, असे आम्हाला कदापि वाटत नाही. कसून मेहनत घ्यावी लागणार असून, चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे, याची कल्पना आहे.’’
वन-डे सामन्यांच्या मालिकेतील सलामी लढत कानपूरमध्ये खेळली जाणार आहे. आमचा संघ या मालिकेतही चमकदार सुरुवात करण्यास उत्सुक आहे, असेही ड्युमिनी म्हणाला. ड्युमिनीने सांगितले की, आमचे लक्ष कानपूर लढतीवर केंद्रित झाले असून सुरुवात चांगली होईल, अशी आशा आहे. त्यामुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल.