नवी दिल्ली : वन डे संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि फलंदाज अजिंक्य रहाणे हे स्टार प्लसच्या ‘नई सोच’या मोहिमेशी जुळले आहेत. हे खेळाडू प्रचाराचा भाग म्हणून आपल्या टी-शर्टवर वडिलांऐवजी आईचे नाव लिहिणार आहेत.आपल्या आणि वडिलांच्या नावाऐवजी आईच्या नावाचे टी-शर्ट घातल्याने लोकप्रियतेत भर पडणार असल्याचे या खेळाडूंचे मत आहे. महिलांच्या उपक्रमांना प्राधान्य देण्याच्या हेतूने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. कंपनीने यासाठी बीसीसीआयसोबत करारदेखील केला. या मोहिमेसंदर्भात धोनी म्हणाला, ‘‘इतक्या दिवसांपासून मी वडिलांच्या नावाचे टी-शर्ट घालून फिरलो तेव्हा यामागील कारण कुणी विचारले नाही.’’ विराट म्हणाला, ‘‘मी जितका कोहली आहे तितकाच सरोज(आईचे नाव)देखील आहे.’’ अजिंक्य म्हणाला, ‘‘वडिलांचे नाव रोशन करा, असे लोक नेहमी सांगतात. पण, आईचे नाव रोशन करणे हे माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे.’’ स्टार इंडियाचे व्यवस्थापक संचालक संजय गुप्ता म्हणाले, ‘‘बीसीसीआयने नई सोच मोहिमेशी जुळणे आमच्यासाठी गौरवास्पद आहे. स्टार प्लसने नेहमी महिलांच्या आयुष्यात आनंद देण्याचा आणि गौरव उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. ही मोहीम आमच्यासाठी आव्हानात्मक आहे.’’
धोनी, विराट, रहाणेच्या टी-शर्टवर आईचे नाव लावणार!
By admin | Updated: October 17, 2016 04:44 IST