खराब षटकांमुळे सामना गमावला : धोनी
By Admin | Updated: October 4, 2015 04:10 IST2015-10-04T04:10:27+5:302015-10-04T04:10:27+5:30
द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात दोन-तीन खराब षटकांतील गोलंदाजीमुळे सामना गमवावा लागला, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पराभवानंतर दिली.

खराब षटकांमुळे सामना गमावला : धोनी
धर्मशाळा : द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात दोन-तीन खराब षटकांतील गोलंदाजीमुळे सामना गमवावा लागला, अशी कबुली टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने पराभवानंतर दिली. या षटकांत अनेक चौकार-षटकारांचा पाऊस पडल्याचे धोनीचे मत आहे.
‘‘भारताने १९९ धावा केल्या, पण गोलंदाजांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. पाहुण्यांनी दोन चेंडू शिल्लक राखून सात गड्यांनी सामना जिंकला. सामनावीर ठरलेल्या जेपी ड्युमिनी याने अक्षर पटेलच्या १६ व्या षटकात तीन षटकार खेचून २२ धावा वसूल केल्या. एखाद्या
गोलंदाजाची एका षटकात धुलाई झाली तरी त्याने ठोस चेंडू टाकून जरब बसवायला हवी, पण असे घडू शकले नाही. हा फलंदाजांचा सामना वाटत होता.
एखाद्या चेंडूवर मोठा फटका मारल्यानंतर पुढचा चेंडू तुम्ही सावध टाकायला हवा. एका षटकात तीन षटकार किंवा चौकार लागणार असतील तर प्रतिस्पर्धी फलंदाजांनी गोलंदाजांवर वर्चस्व मिळविले म्हणून समजाच. आम्हाला दोन-तीन खराब षटकांचा फटका बसला.’’
खेळात अनेक टप्पे येतात, असे सांगून धोनी म्हणाला, ‘‘आम्ही दोन वेळा चार-चार चेंडूंवर भरपूर धावा दिल्या, पण तरीही दडपण आणले. माझ्या मते चांगल्या खेळपट्टीवर २०० धावांचा बचावदेखील गोलंदाजांना कठीण होऊन बसतो. प्रतिस्पर्धी फलंदाज धावा काढण्याच्या तयारीतच असतात.’’
एका षटकात १४-१५ धावा मोजाव्या लागल्यास फलंदाजांवर वर्चस्व गाजविताच येत नसल्याचे सांगून धोनी म्हणाला, ‘‘आश्विन आणि पटेल यांची अंतिम ११ मध्ये केलेली निवड योग्य होती. दवबिंदूंमुळे फिरकी गोलंदाजांना त्रास झाला हे खरे आहे. अक्षरच्या एका खराब षटकाचा अपवाद वगळता त्याने सुरेख मारा केला. टी-२० त धावा निघतातच, पण अक्षरच्या चेंडूची दिशा आणि टप्पा अचूक होता.’’ (वृत्तसंस्था)