हॉकीमध्ये पुरुष, महिला संघांचा विजयाचा निर्धार

By Admin | Updated: August 6, 2016 03:40 IST2016-08-06T03:40:26+5:302016-08-06T03:40:26+5:30

पुरुष हॉकी संघाला आॅलिम्पिक मोहिमेची यशस्वी सुरुवात करीत ३६ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपविण्याची अपेक्षा आहे.

Determined to win men's and women's teams in hockey | हॉकीमध्ये पुरुष, महिला संघांचा विजयाचा निर्धार

हॉकीमध्ये पुरुष, महिला संघांचा विजयाचा निर्धार


रिओ : आॅलिम्पिकपूर्वी दमदार कामगिरी करीत उत्साही झालेल्या पुरुष हॉकी संघाला आॅलिम्पिक मोहिमेची यशस्वी सुरुवात करीत ३६ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपविण्याची अपेक्षा आहे.
आठ वेळेचा सुवर्णविजेता भारतीय संघ १९८० मध्ये मॉस्कोत अखेरचे सुवर्ण जिंकू शकला होता. तेव्हापासून पदकाचा दुष्काळ कायम असून, बीजिंगमध्ये हॉकी संघाला जागा मिळू शकली नव्हती, तर मागच्या लंडन आॅलिम्पिकमध्ये हा संघ तळाच्या स्थानावर होता. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीत रौप्य पदकाची कमाई करीत भारताने पात्रता गाठली. श्रीजेशच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाची पहिली लढत आयर्लंडविरुद्ध होईल.
महिला संघाने ३६ वर्षांनंतर पात्रता मिळविली आहे. मॉस्को येथे १९८० मध्ये महिला संघ खेळला होता. भारताची पहिली लढत जपानविरुद्ध होणार आहे. जपानला भारताने विश्व हॉकी लीगमध्ये पराभूत करीत पात्रता गाठली, हे विशेष. भारतीय पुरुष संघाला गतविजेता जर्मनी, उपविजेता नेदरलँड, कॅनडा आणि अर्जेंटिना यांच्या गटात स्थान मिळाल्याने प्रत्येक सामना जिंकणे गरजेचे राहील. श्रीजेश हा विश्वदर्जाचा गोलकिपर असून, मधली फळी आणि बचावफळीदेखील उत्तम आहे. भारत एक विजय आणि एक ड्रॉसह उपांत्यपूर्व फेरी गाठू शकतो. दुसरीकडे जर्मनी, ब्रिटन किंवा नेदरलँडला नमविल्यास उपांत्य फेरीत भारताला आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळावे लागणार नाही.
आयर्लंड पहिल्यांदा आॅलिम्पिक खेळत आहे. विश्व लीगमध्ये या संघाने पाकिस्तान आणि मलेशियाला पराभूत केले होते. भारताच्या आक्रमणाची धुरा सरदारासिंग आणि एस. व्ही. सुनील यांच्या खांद्यावर राहील. बचावफळीत व्ही. आर. रघुनाथ, कोथाजितसिंग आणि रुपिंदरपालसिंग हे आहेत. रोलॅन्ट ओल्टमन्स हे वर्तमानात जगणारे कोच आहेत. ते म्हणाले, ‘भूतकाळात काय घडले हे मला माहीत नाही, पण यंदा चांगल्या कामगिरीची मला आशा आहे. खेळाडूंवर मात्र दडपण आणणार नाही. आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही, याची मी वारंवार खेळाडूंना कल्पना देतो.’
१३ व्या स्थानावर असलेला भारतीय हॉकी संघ आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळाल्यापासून उत्साही आहे. या संघाचे नेतृत्व ऐनवेळी बदलण्यात आले आहे. रितूराणीऐवजी सुशीला चानू हिच्याकडे संघाची धुरा सोपविण्यात आली. (वृत्तसंस्था)
>भारतीय हॉकी संघ पुरुष :
पी. आर. श्रीजेश (कर्णधार व गोलकिपर) बचाव फळी : व्ही. आर. रघुनाथ, कोथाजीतसिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीतसिंग, मधली फळी : दानिश मुस्तफा, के. चिंग्लेनसानसिंग, मनप्रीतसिंग, सरदारासिंग, एस. के. उथप्पा, देवेंद्र वाल्मीकी. आक्रमक फळी : एस. व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, रमनदीप्सिंग, निकिन थिमय्या, रुपिंदरपालसिंग, विकास दहिया, प्रदीप एम.
महिला संघ : सविता (गोलकिपर), बचाव फळी : सुशीला चानू (कर्णधार), दीप ग्रेस इक्का, दीपिका, नमिता टोप्पो, सुनीता लाकडा मिडफिल्डर : नवजोत कौर, मोनिका, रेणुका यादव, लिलिमा मिंज आक्रमक फळी : निक्की प्रधान, अनुराधा देवी, पूनम रानी, वंदना कटारिया, राणी रामपाल, प्रीती दुबे, रजनी ई, एच लाल रुआत फेली.
>हॉकी संघ उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाही
उद्या ब गटात आयर्लंडविरुद्धची सलामीची लढत खेळायची असल्यामुळे भारतीय पुरुष हॉकी संघ रिओ आॅलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाही. तथापि, महिला हॉकी संघाचा मात्र आॅलिम्पिक सोहळ्यात सहभाग असेल.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले, ‘‘उद्घाटन सोहळा जास्त वेळ असेल. त्यामुळे आम्ही खेळाडूंना थकवू इच्छित नाही. आमचा उद्या सामना आहे.’’ सूत्रांनी म्हटले, की जे किट खेळाडूंना देण्यात आले आहे, ते अनेक खेळाडूंना पूर्णपणे फिट आले नाही. खेळाडू रिओत उशिरा पोहोचले होते आणि दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांना किट देण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्याजवळ फिटिंगसाठी पुरेसा वेळ नव्हता.

Web Title: Determined to win men's and women's teams in hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.