१९ सेकंदांत २०० मीटर अंतर धावण्याची इच्छा
By Admin | Updated: June 14, 2015 01:52 IST2015-06-14T01:52:03+5:302015-06-14T01:52:03+5:30
२०१६च्या रियो आॅलिम्पिकमध्ये २०० मीटरची दौड १९ सेकंदांत पूर्ण करण्याची इच्छा वेगवान दौडीचा बादशाह जमेकाचा युसेन बोल्ट याने व्यक्त केली आहे.

१९ सेकंदांत २०० मीटर अंतर धावण्याची इच्छा
न्यूयॉर्क : २०१६च्या रियो आॅलिम्पिकमध्ये २०० मीटरची दौड १९ सेकंदांत पूर्ण करण्याची इच्छा वेगवान दौडीचा बादशाह जमेकाचा युसेन बोल्ट याने व्यक्त केली आहे.
डायमंड लीग ग्रॅण्डप्रिक्सच्या २०० मीटर दौडीत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्क शहरात दाखल झालेला बोल्ट पत्रकारांशी बोलताना म्हणाला, ‘‘२०० मीटर दौडीचे अंतर १९ सेकंदांत पूर्ण करणे हे लक्ष्य मी ठेवले आहे.’’ वेगवान दौैडीतील १०० आणि २०० मीटरचे विश्वविक्रम बोल्टच्या नावावर आहेत. त्याने बर्लिनमध्ये १९.१९ सेकंदांत २०० मीटर अंतर पूर्ण केले होते. याच शहरात त्याने १०० मीटर दौड ९.५८ सेकंद अशा विक्रमी वेळेत जिंकली.
पुढील लक्ष्याबाबत बोल्ट म्हणाला, ‘‘भविष्यातील अॅथलिटपुढे मी कठीण लक्ष्य ठेवू इच्छितो. त्यासाठी पुढील आॅलिम्पिकमध्ये कमी वेळेत विश्वविक्रमी कामगिरी करावी लागेल. रियोमध्ये तीन सुवर्ण पटकवाण्याच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. याशिवाय, २०० मीटर दौड १९ सेकंदांत जिंकायचीच आहे. ट्रॅकला अलविदा करण्याआधी मी ठरविलेले लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करीन.
संपूर्ण फोकस सराव आणि सरावावर आहे. लक्ष्य गाठण्यासाठी आणखी दोन सीझनचा वेळ आहे. माझी आवडीची शर्यत १०० नव्हे, तर २०० मीटर आहे. १०० मीटरमध्ये चाहत्यांसाठी सहभागी होतो; पण माझ्या समाधानासाठी नेहमी २०० मीटरमध्येच धावू इच्छितो. चाहते १०० मीटरमध्ये धावताना पाहू इच्छितात आणि आनंद लुटतात त्यामुळे त्यांच्यासाठी मी १०० मीटर धावत असतो.’’ (वृत्तसंस्था)