दिल्लीचा दिमाखदार विजय
By Admin | Updated: May 2, 2015 00:11 IST2015-05-02T00:11:45+5:302015-05-02T00:11:45+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्सने पंजाब संघाचा डाव ८ बाद ११८ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.५ षटकांत एक गडी गमावत पूर्ण केल्या.

दिल्लीचा दिमाखदार विजय
दिल्ली डेअरडेव्हिल्सने पंजाब संघाचा डाव ८ बाद ११८ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.५ षटकांत एक गडी गमावत पूर्ण केल्या.
त्याआधी, नॅथन कोल्टर नाईल व दुखापतीनंतर पुनरागमन करणारा अनुभवी झहीर खान यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा डाव ८ बाद ११८ धावांत रोखला. कोल्टर नाईलने २० धावांच्या मोबदल्यात ४ तर झहीरने १७ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. आॅफ स्पिनर कर्णधार जेपी ड्युुमिनीने किफायती गोलंदाजी करताना ४ षटकांत १५ धावांमध्ये एक बळी घेतला. यजमान संघाच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पाहुण्या संघाच्या डावात केवळ ९ चौकार व ३ षटाकरांची नोंद झाली.
डेव्हिड मिलर (४२) आणि अक्षर पटेल (२२) यांनी सातव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केल्यामुळे पंजाब संघाला सन्मानजनक धावसंख्येची मजल मारता आली. मिलरने ४२ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार व १ षटकार ठोकला तर अक्षरच्या २६ चेंडूंच्या खेळीमध्ये एका षटकाराचा समावेश आहे. या दोन फलंदाजांव्यतिरिक्त कर्णधार जॉर्ज बेली (१८) दुहेरी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला.
ड्युमिनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या आठव्या पर्वात पहिला सामना खेळणाऱ्या झहीरने शानदार सुरुवात करताना सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर वीरेंद्र सेहवागला (१) माघारी परतवले. त्यानंतर ड्युमिनीने पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर शॉर्न मार्शला (५) तंबूचा मार्ग दाखवित दिल्ली संघाला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतरच्या षटकात झहीरने सलामीवीर मनन व्होराला (१) यष्टिरक्षक जाधवकडे झेल देण्यास भाग पाडले तर कोल्टर नाईलने रिद्धिमान साहाचा (०३) अडथळा दूर केला. त्यावेळी पंजाबची ४ बाद १० अशी अवस्था झाली होती.
लेग स्पिनर अमित मिश्राने त्यानंतर बेलीला (१८) बाद करीत पंजाबला पाचवा धक्का दिला. तिसारा परेराला (३) मोठी खेळी करता आली नाही. त्याला कोल्टर नाईलने बाद केले. (वृत्तसंस्था)