दिल्लीची १२१ धावापर्यंत मजल
By Admin | Updated: May 17, 2016 23:57 IST2016-05-17T21:26:03+5:302016-05-17T23:57:33+5:30
गोलंदाजांनी केलेल्या अचूक टप्याच्या माऱ्याच्या जोरावर पुणे संघाने दिल्लीला निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १२१ धावांवर रोखले.

दिल्लीची १२१ धावापर्यंत मजल
>ऑनलाइन लोकमत
विशाखापट्टणम, दि. १७ : अॅडम झम्पा आणि अशोक डिंडा यांच्या भेदक माऱ्यापुढे दिल्ली डेअरडेव्हिल्सची रायजिंग पुणे सुपरजायन्टस्विरुद्ध पुरती दाणादाण झाली. २० षटकांत दिल्ली संघ केवळ ६ बाद १२१ धावा उभारु शकला. झम्पाने चार षटकांत २१ धावा देत तीन तसेच डिंडाने चार षटकांत २० धावा देत तीन गडी बाद केले. दिल्लीकडून तिसऱ्या स्थानावर आलेला करुण नायर हाच सर्वाधिक ४१ धावा काढण्यात यशस्वी ठरला.
अन्य फलंदाजांना धावा काढण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. जेपी ड्यूमिनी १४ आणि संजू सॅम्सन १० धावा काढून बाद झाले. अखेरच्या काही षटकांत ख्रिस मॉरिस याने २० चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३८ धावांची खेळी करीत दिल्लीला धावांचे शतक गाठून दिले.
प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाद झालेल्या पुण्याचा कर्णधार महेंद्रसिंग याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. गमविण्यासारखे काहीच नसल्याने पुण्याच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच वर्चस्वपूर्ण मारा करीत दिल्लीच्या फलंदाजांच्या फटकेबाजीवर अंकुश लावला होता.