दिल्लीची ‘खिल्ली’!

By Admin | Updated: April 27, 2015 01:54 IST2015-04-27T01:54:00+5:302015-04-27T01:54:00+5:30

‘सुपर’ गोलंदाजीनंतर कर्णधार विराट कोहली (३५) आणि ‘षट्कार किंग’ ख्रिस गेलच्या (६२) नाबाद ९५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने

Delhi's 'scandal'! | दिल्लीची ‘खिल्ली’!

दिल्लीची ‘खिल्ली’!

दिल्ली : ‘सुपर’ गोलंदाजीनंतर कर्णधार विराट कोहली (३५) आणि ‘षट्कार किंग’ ख्रिस गेलच्या (६२) नाबाद ९५ धावांच्या भागीदारीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दहा गडी आणि ५७ चेंडू राखून मात केली. ‘आयपीएल’मधील २६ व्या सामन्यात जबरदस्त प्रदर्शन करीत बंगलोरने दिल्लीची एकप्रकारे ‘खिल्ली’च उडवली. यजमान दिल्ली डेअरडेव्हिल्सचा डाव अवघ्या १८.२ षटकांत ९५ धावांवर संपुष्टात आला होता. हे सोपे आव्हान बंगलोरने १०.३ षटकांत गाठले.
दिल्लीच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या बंगलोरने आक्रमक सुरुवात केली. कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल या जोडीने गोलंदाजांची धुलाई करीत अवघ्या ३६ चेंडूंत संघाचे अर्धशतक साजरे केले. गेलने २९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर विराटने २३ चेंडूंत नाबाद ३५ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ६ चौकारांचा समावेश आहे. दुसरीकडे, ख्रिस गेलने नाबाद ६२ धावा केल्या. या धावा त्याने केवळ ४० चेंडूंत फटकारल्या. यामध्ये गेलने ६ चौकार आणि ४ षट्कार ठोकले.
त्याआधी, दिल्लीची या सत्रातील ९५ ही नीचांकी धावसंख्या ठरली. मिशेल स्टार्कचे ३ बळी दिल्लीसाठी घातक ठरले. केदार जाधवच्या सर्वाधिक ३३ धावांच्या खेळीमुळे दिल्लीला ९५ धावसंख्येपर्यंत तरी मजल मारता आली. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. विराटचा हा निर्णय गोलंदाजांनी यशस्वी ठरवला. पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर स्टार्कने अय्यरला शून्यावर पायचित केले.
त्यानंतर मयंक अग्रवाल आणि जेपी ड्यूमिनी या जोडीने ३५ धावांची भागीदारी केली. गेल्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या डेव्हिड विजेने ही जोडी फोडली. १४ चेंडूंत १३ धावा करणाऱ्या ड्यूमिनीला त्याने कार्तिककरवी झेलबाद केले. त्यानंतर अ‍ॅरोनने सलग दोन धक्के दिले. युवराज सिंग आणि अँजेलो मॅथ्यूजला त्याने अनुक्रमे २ आणि शून्यावर माघारी धाडले. त्यावेळी दिल्लीची स्थिती ४ बाद ३९ अशी होती. केदार जाधव आणि मयंक अग्रवाल यांनी दिल्लीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मयंक इक्बाल अब्दुल्लाच्या चेंडूला ‘कट’ करण्याच्या नादात कार्तिककडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर नव्याने आलेले फलंदाज केवळ हजेरी लावत परतले. अमित मिश्रा (२) आणि नदीम या दोघांनाही स्टार्कने सलग बाद करीत दिल्लीची ‘दैना’ केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Delhi's 'scandal'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.