दिल्लीचा ‘डायनामिक’ खेळ

By Admin | Updated: October 15, 2014 04:23 IST2014-10-15T04:23:23+5:302014-10-15T04:23:23+5:30

सामन्याचा पहिला हाफ अटीतटीचाच राहिला. दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाल्याने जवाहरलाल स्टेडियमवरील वातावरण तापले होते

Delhi's Dynamic Games | दिल्लीचा ‘डायनामिक’ खेळ

दिल्लीचा ‘डायनामिक’ खेळ

दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यजमान दिल्ली डायनामोस संघाने नावाप्रमाणे ‘डायनामिक’ खेळ करून चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या या डायनामिक खेळाला पुणे सिटी एफसीकडून तोडीसतोड उत्तर मिळाले मंगळवारी झालेली ही लढत गोलशुन्य राहिली.
सामन्याचा पहिला हाफ अटीतटीचाच राहिला. दोन्ही संघांकडून आक्रमक खेळ झाल्याने जवाहरलाल स्टेडियमवरील वातावरण तापले होते. ब्रुनो सिरीलिओ आणि डॅनिएल मॅग्लीओछेट्टी या पुणेरी जोडीने चेंडू आपल्याजवळ ठेवून गोलपोस्टपर्यंत हळुहळू आगेकूच केली होती, परंतु दिल्लीच्या शौविक घोष याने चेंडू हिसकावला. घोषने चेंडूवरील ताबा न सोडता गोलपोस्टपर्यंत घेऊन गेला आणि स्टेडियमवर जल्लोषाला उधाण आले. आक्रमक खेळाच्या रणनितीने मैदानात उतरलेल्या दिल्लीचा हा खेळ पाहून चाहत्यांमधला उत्साह वाढला. ५व्या मिनिटाला सिरीलिओ याने गोलपोस्टपासून ३० यार्ड दूर असलेल्या दिल्लीच्या मॅड जंकर याला पाडल्याने सामन्याचा पहिला फाऊल झाला. दिल्लीची भर आक्रमणावरच असल्याने त्यांच्याकडून वारंवार हल्ले होत होते. मात्र पुण्याचा गोली एमॅन्युएल बेलार्डी हा त्यांचे आक्रमण चोखपणे परतवत होता.
दुसऱ्या हाफमध्येही दोन्ही संघांमध्ये टशन पाहायला मिळाली. ४९व्या मिनिटाला डॅनिएल मॅग्लीओछेट्टी उजवीकडून चेंडू गोलपोस्ट पर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. त्याने गोलपोस्टच्या दिशेने टोलावलेला चेंडू सिरीलीओ याने अचुक हेरला आणि तो धर्मराज रावनान याला पास केला. पुण्याचा गोल होतो की काय?, या चिंतेने स्टेडियमवर स्तब्धता आली होती, परंतु पुण्याला अपयश आले. चुरशीच्या या लढतीत ५३व्या मिनिटाला दिल्लीला गोल करण्याची पुन्हा संधी मिळाली. दिल्लीला मिळालेल्या फ्रि किकचे रुपांतर गोलमध्ये करण्यासाठी डेल पिएरोने पुढाकार घेतला आणि स्टेडियमवर त्याच्या नावाचा डंका वाजू लागला. पिएरोला गोल करण्यात अपयश आल्याने दिल्लीच्या पदरी निराशा आली.
५७व्या मिनटाला दिल्लीचा कर्णधार जंकर चेंडू घेऊन अगदी गोलपोस्ट नजीक पोहचला होता. मात्र बेलार्डीने चेंडूवर झडप घातल्याने दिल्लीची आणखी एक संधी हुकली. ५९व्या मिनिटाला पुण्याने कोस्तास कात्सोरानिस याच्या जागी मेहराजुद्दीन वाडू याला मैदानावर आणले. आपल्या आक्रमणाला अधिक धार आणण्यासाठी पुण्याने ६०व्या मिनिटाला दुडू ओमांगबेमी याला मैदानावर उतरवले.
६७व्या मिनिटाला क्वांग एल पार्क याला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागल्याने पुण्याला धक्का बसला. त्याजागी एम पानाडेंटीगुरी याचे आगमन झाले. ९० मिनिटांत सामना गोलशुन्य राहिल्याने अतिरिक्त वेळेत आक्रमण अधिक वाढले. गुस्तावो सांतोस याने डाव्या पायाने टोलावलेला चेंडू गोली बेलार्ड यालाही चकवून गोल पोस्टच्या दिशेने सरकला, मात्र चेंडू गोलपोस्टच्या पोलला लागून माघारी परतला आणि दिल्लीचा विजय हिरावला.

Web Title: Delhi's Dynamic Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.