दिल्ली कसोटीवर टांगती तलवार

By Admin | Updated: November 12, 2015 23:34 IST2015-11-12T23:34:13+5:302015-11-12T23:34:13+5:30

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला(डीडीसीए) पोखरून टाकणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारने दोन सदस्यांची समिती नेमली

Delhi Test hanging sword | दिल्ली कसोटीवर टांगती तलवार

दिल्ली कसोटीवर टांगती तलवार

नवी दिल्ली : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला(डीडीसीए) पोखरून टाकणाऱ्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दिल्ली सरकारने दोन सदस्यांची समिती नेमली. ही समिती पुढील ४८ तासांत अहवाल सादर करणार आहे. दरम्यान या प्रकरणामुळे फिरोजशाह कोटलावर होणाऱ्या भारत-द. आफ्रिका यांच्यातील अखेरच्या कसोटी सामन्याच्या आयोजनाबाबत संशयाचे ढग निर्माण झाले आहेत.
माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘सरकारने दिल्लीचे क्रीडा सचिव आणि शहर विकास सचिव यांचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती आमच्या तक्रारींचा तपास करेल शिवाय डीडीसीए पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या कामाची दखल घेणार आहे.’
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र क्रिकेट संघाचे अध्यक्ष असलेले बेदी पुढे म्हणाले,‘अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आम्ही डीडीसीएतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणू शकलो. अनेक घोटाळे झाले असून ही प्रकरणे आम्ही पुढे आणणार आहोत. दिल्ली रणजी संघाचा कर्णधार गौतम गंभीर हा देखील गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेटून आल्याची चर्चा आहे.
फिरोजशाह कोटलावर कसोटीचे आयोजन करण्यासाठी स्टेडियम सज्ज करण्यास १७ नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला आहे. भ्रष्टाचार आणि परस्परातील वाद यामुळे डीडीसीए नेहमीच चर्चेत राहिली. बीसीसीआयने नुकत्याच झालेल्या आमसभेदरम्यान भारत-द. आफ्रिका कसोटी सामन्याच्याआयोजनासाठी डीडीसीएला १७ नोव्हेंबरपर्यंत वेळ दिली आहे. डीडीसीएने निर्धारित वेळेत होकार न कळविल्यास त्यांच्याकडून कसोटीचे यजमानपद काढून घेतले जाईल. चौथी कसोटी ४ डिसेंबरपासून होणार आहे.’
कसोटी सामन्याचे आयोजन करण्यासाठी दिल्ली सरकारकडून मदतीची अपेक्षा करणाऱ्या डीडीसीएतील भ्रष्टाचाराचा अहवाल ४८ तासांत समिती सोपविणार असल्याने आयोजनात सक्रिय असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आॅक्टोबरमध्ये दिल्ली सरकारने डीडीसीएला २४.४५ कोटींचा मनोरंजन कर भरण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे बीसीसीआयने देखील डीडीसीएला ‘बॅलेन्स शीट’ सादर करण्यास सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आयोजनापूर्वीच डीडीसीएवर संकट घोंघावू लागले आहे. एकीकडे दिल्ली सरकारने कर भरण्यासाठी संघटनेला कोंडीत पकडले असून दुसरीकडे बीसीसीआयची ‘डेडलाईन’ पाळायची आहे.
फिरोजशाह कोटला सामन्यासाठी सज्ज न झाल्यास पुणे येथे कसोटी खेळविण्यात येईल. कसोटी दर्जा बहाल करण्यात आलेल्या नव्या स्टेडियम्सपैकी कुण्या एकाला अंतिम कसोटी सामन्याचे यजमानपद सोपविण्याचे संकेत बीसीसीआयने आमसभेत दिलेच आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Delhi Test hanging sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.