दिल्ली-गुजरात अंतिम फेरीत
By Admin | Updated: December 27, 2015 02:31 IST2015-12-27T02:31:31+5:302015-12-27T02:31:31+5:30
दिल्ली आणि गुजरात संघांनी विजय हजारे करंडक वन डे क्रिकेटच्या उपांत्य लढतीत शनिवारी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली.

दिल्ली-गुजरात अंतिम फेरीत
बंगळुरू/अलूर : दिल्ली आणि गुजरात संघांनी विजय हजारे करंडक वन डे क्रिकेटच्या उपांत्य लढतीत शनिवारी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली.
उन्मुक्त चंदच्या नाबाद ८० धावांच्या बळावर दिल्लीने हिमाचल प्रदेशचा सहा गडी राखून पराभव केला. हिमाचलने ५० षटकांत ९ बाद २०० धावांपर्यंत मजल गाठली होती. दिल्लीने ४१.१ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात सामना जिंकला. उन्मुक्तने ८६ चेंडू टोलवित सात चौकार व दोन षटकार ठोकले. शिखर धवनने ३९ आणि गौतम गंभीरने १६ धावा केल्या. हिमाचलसाठी कर्णधार विपुल शर्मा याच्या ४५ धावांचा अपवाद वगळता अन्य फलंदाज प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. दिल्लीकडून सुबोध भाटी, पवन नेगी, नितीश राणा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
अक्षर पटेलच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट माऱ्याच्या बळावर गुजरातने तमिळनाडूचा ३१ धावांनी पराभव केला. तमिळनाडूच्या पराभवामुळे अभिनव मुकुंदची शतकी खेळी व्यर्थ ठरली. तमिळनाडूने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण देताच गुजरातने मनप्रीत जुनेजा ७४ आणि चिराग गांधी ७१ यांच्या अर्धशतकांमुळे ५० षटकांत ८ बाद २४८ धावा उभारल्या. तमिळनाडूकडून रविचंद्रन आश्विन याने ५१ धावांत तीन आणि विजय शंकर याने ३६ धावांत दोन गडी बाद केले. तमिळनाडूकडून अभिनव मुकुंद (नाबाद १०४) आणि दिनेश कार्तिक ४१ यांनी सलामीला १६.२ षटकांत ८४ धावा ठोकल्या. पण ही जोडी बाद होताच अक्षरच्या फिरकीपुढे २१७ धावांत संघ गारद झाला. अक्षरने ४३ धावा देत सहा गडी बाद केले. जसप्रीत बुमराह याने दोन गडी बाद केले. (वृत्तसंस्था)