दिल्लीचा ‘डेअरिंग’बाज विजय
By Admin | Updated: May 21, 2016 04:48 IST2016-05-21T04:48:50+5:302016-05-21T04:48:50+5:30
रोमांचक सामन्यात करुण नायरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हील्सने सनरायझर्स हैदराबादला ६ विकेट्सने नमवले.

दिल्लीचा ‘डेअरिंग’बाज विजय
रायपूर : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात करुण नायरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हील्सने सनरायझर्स हैदराबादला ६ विकेट्सने नमवले. या विजयासह दिल्लीने प्ले आॅफ गाठण्यासाठी आपली दावेदारी आणखी मजबूत केली.
शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने क्षेत्ररक्षण स्वीकारुन हैदराबादला ७ बाद १५८ धावा असे मर्यादेत रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अडखळती झाली. क्विंटन डीकॉक स्वस्तात परतल्यानंतर रिषभ पंत व करुण नायर यांनी ७३ धावांची भागीदारी करुन दिल्लीला सावरले. भुवनेश्वरने पंतला धावबाद करुन ही जोडी फोडली. पंतने २६ चेंडूत ३२ धावा केल्या. नायरने जेपी ड्युमिनीसह संघाला विजयी मार्गावर आणले. दरम्यान, यावेळी गचाळ क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका हैदराबाद बसला. नायर व ड्युमिनी यांचे सोपे झेल यावेळी सुटल्याने दिल्लीने याचा फायदा घेत विजय मिळवला. या दोघांनी ३५ धावांची भागीदारी केली. ड्युमिनी (१७) बाद झाल्यानंतर कार्लोस ब्रेथवेटही (१०) लगेच परतला. परंतु, जम बसलेल्या नायरने ५९ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८३ धावा फटाकवत संघाला विजयी केले. बरिंदर सरणने २ बळी घेत दिल्लीला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला.
तत्पूर्वी डेव्हीड वॉर्नरच्या ७३ धावांच्या कॅप्टन्स इनिंग्जच्या जोरावर हैदराबादने समाधानकार मजल मारली. ब्रेथवेटने दोन महत्त्वपूर्ण बळी घेत हैदराबादच्या धावसंख्येला ब्रेक मारला. वॉर्नरने ५६ चेंडूत ८ चौकार व एका षटकारासह आपली खेळी सजवली. अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीमुळे हैदराबादला दिडशेचा टप्पा पार करण्याचे समाधान लाभले. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकात
७ बाद १५८ धावा (वॉर्नर ७३, हेन्रीकेज १८; ब्रेथवेट २/२७) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हील्स : २० षटकात ४ बाद १६१ धावा (करुण नायर नाबाद ८३, रिषभ पंत ३२; बरिंदर सरण २/३४)