गतविजेत्या शारापोव्हाचे पॅक-अप!

By Admin | Updated: June 2, 2015 01:03 IST2015-06-02T01:03:06+5:302015-06-02T01:03:06+5:30

टेनिससुंदरी आणि गतविजेत्या रशियाच्या मारिया शारापोव्हा हिच्यावर चौथ्या फेरीत चेक गणराज्यच्या लुसी सफारोव्हाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

Defender Sharapova pack-up! | गतविजेत्या शारापोव्हाचे पॅक-अप!

गतविजेत्या शारापोव्हाचे पॅक-अप!

पॅरिस : टेनिससुंदरी आणि गतविजेत्या रशियाच्या मारिया शारापोव्हा हिच्यावर चौथ्या फेरीत चेक गणराज्यच्या लुसी सफारोव्हाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. याबरोबरच तिला प्रतिष्ठेच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले. दुसरीकडे, दुसऱ्या मानांकित रॉजर फेडररने पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
गतविजेत्या शारापोव्हाला चेक गणराज्यच्या लुसी सफारोव्हाने सरळ सेटमध्ये म्हणजे ७-६, ६-४ ने पराभूत केले. हा स्पर्धेतील मोठा उलटफेर ठरला. सफारोव्हा हिने आता पहिल्यांदाच फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठली आहे. आता तिचा सामना स्पेनच्या गारबाइन मुगुरुजा हिच्याविरुद्ध होईल.
याआधी, २०१२ आणि २०१४ ची चॅम्पियन आणि २०१३ ची उपविजेती असलेल्या मारिया शारापोव्हाने कालचा उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना पावसामुळे पुढे म्हणजे आजवर ढकलला होता. आज सामन्यात मारिया शारापोव्हाने सुरुवातीपासूनच चुका केल्या. त्या तिला महागड्या ठरल्या. शारापोव्हाने पहिल्या सेटमध्ये दुसरीच सर्व्हिस गमावली. त्यानंतर मात्र तिने प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस भेदली. सफारोव्हाने पहिला सेट टायब्रेकरवर जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये या दोन्ही खेळाडूंनी एकमेकांविरुद्धची सर्व्हिस मोडून काढली. त्यानंतर शारापोव्हा सामना वाचविण्यासाठी धडपडत होती. मारियाने पहिला मॅच पॉइंट वाचवला; मात्र सफारोव्हाने दुसरा मॅच पॉइंट जिंकत सामना खिशात घातला.
आठव्या मानांकित वावरिंकाने१२ व्या मानांकित जाईल्स साइमनचा पराभव केला. हा त्याचा रॉलंड गॅरोस मैदानावरील ४० वा विजय आहे. अन्य सामन्यात, २०१३ चा उपविजेता ठरलेल्या फेररने नवव्या मानांकित सिलीच याचा ६-२, ६-२, ६-४ ने पराभव केला. आता पुढील फेरीत त्याची लढत तिसऱ्या मानांकित ब्रिटनच्या अ‍ॅँडी मरे आणि फ्रान्सचा बिनमानांकित जेरेमी चार्डी यांच्यातील विजेत्याशी होईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Defender Sharapova pack-up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.