मुंबईकरांचा दारुण पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 02:02 IST2016-05-14T02:02:16+5:302016-05-14T02:02:16+5:30
कर्णधार व सलामीवीर मुरली विजय आणि वृद्धिंमान साहा यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दणदणीत विजय मिळविताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सने धुव्वा उडविला.

मुंबईकरांचा दारुण पराभव
विशाखापट्टणम : कर्णधार व सलामीवीर मुरली विजय आणि वृद्धिंमान साहा यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने दणदणीत विजय मिळविताना गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ७ विकेट्सने धुव्वा उडविला. मुंबईने दिलेल्या १२५ धावांचा पाठलाग करताना पंजाबने १७ व्या षटकातच ३ फलंदाजांच्या मोबदल्यात १२७ धावा फटकावल्या. विजयने नाबाद ५४ धावांची खेळी केली.
डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १२४ अशी मर्यादित मजल मारली. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला पहिल्याच षटकात हाशिम आमलाच्या रूपाने पहिला धक्का देण्यात मुंबईकर यशस्वी ठरले. मात्र, यानंतर विजय व वृद्धिमान यांनी ११६ धावांची निर्णायक भागीदारी करून मुंबईचा पराभव स्पष्ट केला. वृद्धिमान ४० चेंडंूत ६ चौकार व एका षट्कारासह ५६ धावा काढून बाद झाला. मात्र, तोपर्यंत पंजाबचा विजय स्पष्ट झालेला. यानंतर ग्लेन मॅक्सवेलही (०) झटपट बाद झाला. गुरकीरत मान सिंगने (नाबाद ६) विजयला साथ देताना संघाच्या विजयावर शिक्का मारला. विजयने कॅप्टन इनिंग्ज खेळताना ५२ चेंडूंत नाबाद ५४ धावा काढताना ५ चौकार व एक षट्कार ठोकला.
तत्पूृवी, मार्कस स्टोइनीसच्या (४/१५) जोरावर पंजाबने मुंबईकरांना ९ बाद १२४ असे रोखून सामन्यावर वर्चस्व मिळविले. मुंबईकडून केरॉन पोलार्ड (२७) आणि नितीश राणा (२५) यांच्यामुळे मुंबईला शंभरचा पल्ला पार करण्यात यश आले. कर्णधार रोहित शर्मा (१५), उन्मुक्त चंद (०), अंबाती रायडू (०), जोस बटलर (९) असे प्रमुख फलंदाज झटपट बाद झाल्याने मुंबईकर अडचणीत आले. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ९ बाद १२४ धावा (केरॉन पोलार्ड २७, नितीश राणा २५; संदीप शर्मा २/११, मार्कस स्टोइनीस ४/१५, संदीप शर्मा २/११, मोहित शर्मा २/२६) पराभूत वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : १७ षटकांत ३ बाद १२७ धावा (वृद्धिमान साहा ५६, मुरली विजय नाबाद ५४; मिशेल मॅक्कलेनघन २/२४)