रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे दीपा करमाकरचे लक्ष्य
By Admin | Updated: April 19, 2016 18:10 IST2016-04-19T13:56:58+5:302016-04-19T18:10:02+5:30
रिओ ऑलिम्पिक २०१६ साठी पात्र ठरलेली भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट दीपा करमाकरने ऑगस्टमध्ये होणा-या ऑलिम्पिकममध्ये पदक मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे

रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे दीपा करमाकरचे लक्ष्य
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - रिओ ऑलिम्पिक २०१६ साठी पात्र ठरलेली भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट दीपा करमाकरने ऑगस्टमध्ये होणा-या ऑलिम्पिकममध्ये पदक मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सुवर्णपदक मिळाल्यामुळे मला आनंद होत आहे. पण माझे पुढचे लक्ष्य रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचे आहे. रिओमध्ये मी माझे सर्वोत्तम प्रयत्न करीन असे दीपाने सांगितले.
त्रिपुराच्या २२ वर्षीय दीपाने सोमवारी शेवटच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत ५२.६९८ गुण मिळवून ऑलिम्पिकमधील आर्टीस्टिक जिम्नॅस्टीक्सच्या क्रीडा प्रकारात स्थान निश्चित केले. ऑलिम्पिक प्रवेश निश्चित करताना दीपाने २००८ मधील उझबेकिस्तानची रौप्यपदक विजेती ओकसानाचा पराभव केला.
दीपा जिम्नॅस्ट क्रीडा प्रकारामध्ये पात्र ठरणारी पहिली महिला असण्याबरोबरच ५२ वर्षानंतर पात्र ठरलेली ती भारताची पहिली जिम्नॅस्ट आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकूण ११ भारतीय पुरुष जिम्नॅस्टिकपटू ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. १९५२ मध्ये दोन, १९५६ मध्ये तीन आणि १९६४ मध्ये सहा पुरुष जिम्नॅस्ट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते.