दीपाने घडविला इतिहास

By Admin | Updated: April 19, 2016 03:39 IST2016-04-19T03:39:46+5:302016-04-19T03:39:46+5:30

दीपा करमाकरने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट होण्याचा मान मिळवला.

Deepa History | दीपाने घडविला इतिहास

दीपाने घडविला इतिहास

रिओ जानेरिओ : दीपा करमाकरने सोमवारी ऐतिहासिक कामगिरी करताना आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट होण्याचा मान मिळवला. दीपाने येथे अखेरच्या पात्रता व चाचणी स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत रिओ आॅलिम्पिकचे तिकीट मिळवले. २२ वर्षीय दीपाने एकूण ५२.६९८ गुणांची कमाई करीत आॅगस्टमध्ये होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये कलात्मक (आर्टिस्टिक) जिम्नॅस्टिकसाठी स्थान निश्चित केले. आॅलिम्पिकसाठी ५२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिम्नॅस्टिकमध्ये पात्रता गाठणारी दीपा पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ११ भारतीय पुरुष जिम्नॅस्टिकपटूंनी आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला. त्यापैकी १९५२ मध्ये दोन, १९५६ मध्ये तीन आणि १९६४ मध्ये सहा
खेळाडू सहभागी झाले होते.
दीपा आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय
महिला जिम्नॅस्ट आहे. आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघातर्फे अधिकृतपणे जाहीर झालेल्या यादीमध्ये
दीपाने रिओ आॅलिम्पिकसाठी
पात्रता मिळवली असल्याचे स्पष्ट
केले आहे.
जागतिक महासंघाने स्पष्ट केले, की रिओमध्ये जिम्नॅस्टिक चाचणी स्पर्धेत महिला पात्रता स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघाने (एफआयजी) रिओ २०१६ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या देशांची व वैयक्तिक खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
दीपाला रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणाऱ्या महिला कलात्मक जिम्नॅस्ट क्रीडा प्रकारात वैयक्तिक पात्रता यादीतील ७९ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.
चाचणी स्पर्धेतील सर्वांत खडतर असलेल्या वॉल्ट राउंडमध्ये दीपाने १५.०६६ गुणांची कमाई केली. सहभागी झालेल्या १४ स्पर्धकांमध्ये ही सर्वाधिक गुणसंख्या होती, पण अनइव्हन बारमध्ये तिची कामगिरी निराशाजनक ठरली. त्यात तिला केवळ ११.७०० गुणांची कमाई करता आली. सहभागी स्पर्धकांमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्यांत ती दुसऱ्या स्थानावर होती. त्रिपुराच्या या जिम्नॅस्टने बीम व फ्लोअर एक्सरसाईजमध्ये अनुक्रमे १३.३६६ व १२.५६६ गुण मिळवले.
आंतरराष्ट्रीय रेफ्री दीपक कागरा म्हणाले, ‘‘दीपाच्या चमकदार कामगिरीनंतर ती रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणार असल्याचे निश्चित झाले होते. दीपाच्या कामगिरीचा जिम्नॅस्टिक वर्तुळाला अभिमान आहे.’’ (वृत्तसंस्था)
> तळवे सपाट, तरी देशातील सर्वोत्तम जिम्नॅस्ट
नवी दिल्ली : ५२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतातर्फे आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली महिला जिम्नॅस्ट ठरलेली दीपा करमाकर एक वेळ सपाट तळवे असल्यामुळे या क्रीडाप्रकारात सहभागी होण्यास असमर्थ होती. ९ आॅगस्ट १९९३ रोजी त्रिपुरातील आगरताळा येथे जन्मलेल्या दीपाने वयाच्या सहाव्या वर्षापासून जिम्नॅस्टिकची कास धरली. त्या वेळी दीपाच्या पायाचे तळवे सपाट होते. जिम्नॅस्टिकमध्ये अशा प्रकारच्या व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते; पण अनुभवी प्रशिक्षक बिस्बेश्वर नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिम्नॅस्टिक्सचा सराव करणाऱ्या दीपाने या अडचणीतून मार्ग काढला.
दीपाचे प्रशिक्षक नंदी म्हणाले, ‘‘दीपा ज्या वेळी माझ्याकडे आली, त्या वेळी तिचे तळवे सपाट होते. जिम्नॅस्टिक्स या क्रीडाप्रकारासाठी ही अडचणीची बाब आहे. अशा पायामुळे अ‍ॅथलिटला आपले संतुलन राखणे, धावणे किंवा उडी मारणे अडचणीचे ठरते. दीपासाठी यातून मार्ग काढण्याचे सर्वांत मोठे आव्हान होते. दीपाच्या पायामध्ये त्या वेळी सुधारणा करणे सोपे नव्हते; पण आम्ही तिच्या बालपणापासून त्यावर मेहनत घेतली.’’
> दीपाची कामगिरी युवा
पिढीला प्रेरित करणारी : तेंडुलकर
नवी दिल्ली : आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरल्यानंतर दीपा करमाकरवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह अन्य व्यक्तींनी तिची या ऐतिहासिक कामगिरीसाठी प्रशंसा केली आहे.
तेंडुलकरने टिष्ट्वट केले, की ‘दीपा ऐतिहासिक कामगिरीसाठी तुझे अभिनंदन! तुझी कामगिरी युवा पिढीला प्रेरित करणारी आहे.’
सोनोवाल यांनी दीपाचे अभिनंदन करताना म्हटले, की ‘भारतीय जिम्नॅस्टिक्सला नवी उंची गाठून देण्यासाठी अभिनंदन! दीपा तुझ्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.’
> दीपाने जिंकले सुवर्णपदक
रियो दी जानेरियो : आॅलिम्पिक स्पर्धेचे आपले
तिकीट पक्के केल्यानंतर भारताच्या दीपा करमाकरने आॅलिम्पिक व्हेन्यू टेस्ट इव्हेन्ट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. २२ वर्षीय दीपाने वॉल्ट्स प्रकारात १४.८३३ गुण संपादन करून सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले.

Web Title: Deepa History

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.