डी कॉकचा शतकी तडाखा

By Admin | Updated: April 18, 2016 02:50 IST2016-04-18T02:50:03+5:302016-04-18T02:50:03+5:30

आक्रमक फलंदाज क्विंटन डी कॉकने झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने धमाकेदार विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ७ गडी राखून लोळवले.

De Kock hits century | डी कॉकचा शतकी तडाखा

डी कॉकचा शतकी तडाखा

बंगळुरू : आक्रमक फलंदाज क्विंटन डी कॉकने झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने धमाकेदार विजय मिळवताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला ७ गडी राखून लोळवले. यंदाच्या मोसमातील पहिले शतक झळकावताना डी कॉकने ५१ चेंडंूत १०८ धावा फटकावल्या. करुण नायरनेही ५४ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकरांना १९२ धावांचे तगडे आव्हान दिले. परंतु, डी कॉकने संघाला एकहाती विजयी करताना आरसीबीच्या हातातील सामना हिसकावून घेतला. आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अडखळती झाली. श्रेयस अय्यर व संजू सॅमसन स्वस्तात परतल्यानंतर डी
कॉक - करुण यांनी तिसऱ्या गड्यासाठी १३४ धावांची निर्णायक भागीदारी करून संघाला विजयी मार्गावर आणले.
शेन वॉटसनने डी कॉकला बाद करून ही जोडी फोडली खरी, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. डी कॉकने ५१ चेंडूंत तब्बल १५ चौकार व ३ षटकारांची आतषबाजी केली. करुणने अखेरपर्यंत नाबाद राहत ४२ चेंडूंत ६ चौकार व एक षटकार खेचत ५४ धावा काढल्या. डी कॉकनंतर करुण व जेपी ड्युमिनी यांनी
संघाच्या विजयावर शिक्का मारला. दिल्लीने १९.१ षटकांत ३ बाद १९२ धावा काढल्या.
तत्पूर्वी, विध्वंसक फलंदाज ख्रिस गेल पुन्हा ‘फेल’ ठरल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स यांचा तुफानी अर्धशतकी हल्ला व अष्टपैलू शेन वॉटसनचा तडाखा या जोरावर आरसीबीने दिल्लीविरुद्ध ५ बाद १९१ अशी मजल मारली. दिल्लीचा कर्णधार झहीर खानने गेलला शून्यावर माघारी धाडत पहिल्याच षटकात आरसीबीला मोठा झटका दिला. मात्र यानंतर कोहली - एबी यांनी खेळपट्टीचा अंदाज घेतल्यानंतर दिल्लीवर हल्ला चढवून दुसऱ्या गड्यासाठी १०७ धावांची भागीदारी केली.
एबीने ३३ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह ५५ धावा फटकावल्या. एबी बाद झाल्यानंतर कोहलीने वॉटसनसह मोर्चा सांभाळला. वॉटसन १९ चेंडूंत २ चौकार व ३ षटकार ठोकून ३३ धावांवर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर परतला. कोहलीही ४८ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांवर शमीचा शिकार ठरल्याने आरसीबीच्या धावसंख्येला अंतिम क्षणी
खीळ बसली. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक :
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत ५ बाद १९१. (विराट कोहली ७९, एबी डिव्हिलियर्स ५५, शेन वॉटसन ३३; मोहम्मद शमी २/३४) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १९.१ षटकांत ३ बाद १९२. (क्विंटन डी कॉक १०८, करुण नायर नाबाद ५४; शेन वॉटसन २/२५).

Web Title: De Kock hits century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.