डेव्हिस चषक ‘प्ले आॅफ’ लढत दिल्लीत
By Admin | Updated: July 30, 2015 00:41 IST2015-07-30T00:41:16+5:302015-07-30T00:41:16+5:30
खेळाडूंची मागणी लक्षात घेत अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) अव्वल मानांकित झेक प्रजासत्ताक संघाविरुद्धची विश्व ग्रुप डेव्हिस चषक टेनिस प्ले आॅफ लढत येथे

डेव्हिस चषक ‘प्ले आॅफ’ लढत दिल्लीत
नवी दिल्ली : खेळाडूंची मागणी लक्षात घेत अ.भा. टेनिस संघटनेने (एआयटीए) अव्वल मानांकित झेक प्रजासत्ताक संघाविरुद्धची विश्व ग्रुप डेव्हिस चषक टेनिस प्ले आॅफ लढत येथे १८ ते २० सप्टेंबरदरम्यान आयोजित केली आहे. पुण्याच्या तुलनेत आयोजनस्थळ म्हणून खेळाडूंनी राजधानीला प्रथम पसंती दर्शविली.
सोमदेव देवबर्मन, युकी भांबरी आणि रोहन बोपण्णा यांनी आर. के. खन्ना स्टेडियममध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. पुणे हे उंचावर असल्याने तेथील परिस्थिती पाहुण्या संघाला अधिक अनुकूल असल्याचे खेळाडूंचे मत होते. दिल्ली लॉन टेनिस संघटनेच्या या मंदगती कोर्टवर सामन्यांचे आयोजन होणार आहे. सोमदेवने या कोर्टवर अद्याप एकही सामना गमावला नाही. हे आयोजन कोलकाता येथे देखील होऊ शकले असते; पण उपरोक्त काळात पावसाची दाट शक्यता असल्याने कोलकाता टाळण्यात आले, अशी माहिती बंगाल टेनिस संघटनेचे अध्यक्ष हुमण्य चॅटर्जी यांनी दिली.
पुणे नाकारण्यात कुठला अडसर आला, असे विचारताच चॅटर्जी म्हणाले, ‘पुण्यातील कोर्टवर चेंडू वेगात येतो आणि पाहुण्या संघातील खेळाडू जलद सर्व्हिस करण्यात पटाईत आहेत. आम्ही आपल्या खेळाडूंना प्राथमिकता दिली. ही लढत अटीतटीची असल्याने आम्ही नवी दिल्लीला प्राधान्य दिले.’ भारतीय संघाचे डेव्हिस कप कोच झिशान अली यांनी एआयटीएच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला. बंगळुरू येथून बोलताना झिशान म्हणाले, ‘युकीचे हे स्थानिक मैदान आहे. त्याच्याकडून आम्हाला मोठ्या आशा आहेत. शिवाय बोपण्णा व सोमदेवचा अनुभव देशासाठी लाभदायी ठरेल.(वृत्तसंस्था)