तारीख पे तारीख... आता १७ आॅक्टोबरला सुनावणी
By Admin | Updated: October 8, 2016 03:37 IST2016-10-08T03:37:42+5:302016-10-08T03:37:42+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २४ तासांचा अल्टिमेटम मिळाल्यानंतर गुरुवारी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार

तारीख पे तारीख... आता १७ आॅक्टोबरला सुनावणी
नवी दिल्ली : लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) २४ तासांचा अल्टिमेटम मिळाल्यानंतर गुरुवारी सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना आता न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १७ आॅक्टोबरपर्यंत स्थगित केली आहे. यामुळे पुन्हा एकदा बीसीसीआयला न्यायालयाच्या आदेशाचे प्रतीक्षा करावी लागेल. त्याचबरोबर, न्यायालयाने बीसीसीआयला राज्य संघटनांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक साह्य करण्यास मनाई केली आहे.
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय खंडपीठाने गुरुवारी बीसीसीआयला लोढा शिफारशी मान्य करण्याचा २४ तासांचा अल्टिमेटम दिला होता. शिवाय, असे न केल्यास दुसऱ्या दिवशी आम्ही आमचा आदेश देऊन बोर्डाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या जागी प्रशासकांच्या समितीची नियुक्ती करू, असेही न्यायालयाने बजावले होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल १७ आॅक्टोबरला देण्याचे निश्चित केले आहे.
त्याच वेळी न्यायालयाने बीसीसीआयला संलग्न राज्य संघटनांना आर्थिक साह्य करण्यापासूनही रोखले आहे. न्यायालयाने सांगितले, ‘‘जोपर्यंत बीसीसीआय लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचे जाहीर करीत नाही, तोपर्यंत राज्य संघटनांना त्यांनी कोणतेही आर्थिक साह्य करू नये.’’ त्याचबरोबर, लोढा समितीच्या शिफारशींसंबंधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सीईओ डेव्हिड रिचडर््सन यांच्याशी बातचित करण्यासाठी वैयक्तिक वचनपत्र सादर करण्याचेही सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना सांगितले आहे. (वृत्तसंस्था)