दरपाळे गावक-यांचा ‘यूएई’ला पाठिंबा
By Admin | Updated: February 28, 2015 01:33 IST2015-02-28T01:24:01+5:302015-02-28T01:33:48+5:30
विश्वचषक स्पर्धेतील आज, शनिवारी रंगणाऱ्या भारत वि. संयुक्त अरब अमिरात (यूएई) सामन्यामध्ये भारतीय चाहत्यांनी संघाचा सलग तिसरा विजय गृहीत धरला आहे.

दरपाळे गावक-यांचा ‘यूएई’ला पाठिंबा
रोहित नाईक, मुंबई
विश्वचषक स्पर्धेतील आज, शनिवारी रंगणाऱ्या भारत वि. संयुक्त अरब अमिरात (यूएई) सामन्यामध्ये भारतीय चाहत्यांनी संघाचा सलग तिसरा विजय गृहीत धरला आहे. असे असले तरी वसई तालुक्यातील नायगाव-दरपाळे गाव मात्र यूएईच्या विजयासाठी प्रार्थना करीत आहे आणि याला कारण आहे ते यूएईचा यष्टिरक्षक-फलंदाज ‘स्वप्निल पाटील’.
मूळचा दरपाळे गावचा असलेल्या स्वप्निलची २०१० मध्ये यूएई संघात वर्णी लागली आणि तेव्हापासून येथे यूएई संघाचे पाठीराखे तयार झाले. गेल्यावर्षी बांगलादेशमध्ये पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच स्वप्निल खेळला. त्यावेळी दरपाळे गावकऱ्यांनी यूएईचे सर्व सामने मोठ्या पडद्यावर पाहिले. आजचा सामना सकाळी असल्याने मैदानात मोठा पडदा लावणे शक्य नाही, तरी आम्ही एका हॉलमध्ये एकत्रितपणे सामन्याचा आनंद घेऊ, असे दरपाळे येथील क्रिकेटप्रेमींनी ‘लोकमत’ला सांगितले.
विश्वचषकाला सुरुवात होण्याच्या आधीपासूनच वसई-नायगावमध्ये स्वप्निलला शुभेच्छा देणारे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे वसई-नायगावचा पूर्ण पाठिंबा यूएईला असणार हे स्पष्टच होते. मात्र, भारत विरुद्धच्या सामन्यासाठीदेखील आम्ही यूएईलाच पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केल्याने आज वसईतील एक गाव पूर्णपणे यूएईचा पाठीराखा असेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच यूएईच्या प्रत्येक चौकार-षट्कारावर किंवा भारताच्या प्रत्येक विकेटवर दरपाळे गावात जल्लोष झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. शिवाय जर का यूएईने सर्वांना चकीत करून भारताला धक्का दिला तर नक्की दिवाळी साजरी केली जाईल. त्यानुसार फटाक्यांचीदेखील तयारी झाली असल्याचे समजले.