अंधेरीत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांची नांदी
By Admin | Updated: September 14, 2016 21:40 IST2016-09-14T21:40:50+5:302016-09-14T21:40:50+5:30
नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि प्युर्तो रिको सामन्याला प्रचंड प्रतिसाद पाहता अंधेरीत लवकरच विविध आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे

अंधेरीत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांची नांदी
>महेश चेमटे / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि प्युर्तो रिको सामन्याला प्रचंड प्रतिसाद पाहता अंधेरीत लवकरच विविध आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) सरचिटणीस कुशल दास यांनी दिली. ते म्हणाले, याच धर्तीवर नवी मुंबई येथील डि.वाय.पाटील स्टेडयममध्ये पार पडणाऱ्या विविध फुटबॉल लीग अंधेरी क्रीडा संकुलात खेळवण्यात येणार आहे.
भारत आणि प्युर्तो रिको यांच्यात ३ सप्टेंबरला मैत्रीपूर्ण सामना झाला. सामन्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शिवाय फुटबॉल चाहत्यांना मेट्रो, लोकल आणि बेस्ट यांच्या माध्यमातून अंधेरी क्रीडा संकुलात पोहचेणे सोईचे आहे. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांच्या हितासाठी लवकरच विविध आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांचे आयोजन अंधेरीत करणार असल्याची माहिती दास यांनी दिली.
गतवर्षी १५ वर्षांखालील मुलांसाठी फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात आले होते. त्या लीगला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर पुढील वर्षी १३ वर्षांखालील राष्ट्रीय लीगचे आयोजन करणार आहे. त्यामुळे लहान वयातच खेळाडूंना प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल,असा विश्वास दास यांनी व्यक्त केला.
नवी मुंबईतील डि.वाय.पाटील स्टेडियम बाबत दास यांना विचारले असता ते म्हणाले, डि.वाय.पाटील स्टेडियमला फिफाच्या पथकाने सध्या तरी ग्रीन सिग्नल दिलेला नाही. स्टेडियमची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात फिफाच्या पथकाकडून तपासणी झाल्यानंतर पाटील स्टेडियमवर विश्वचषकाचा थरार अनुभवता येईल.
‘त्यांना’ फिफाच्या ‘ग्रीन कार्ड’ची प्रतिक्षा !
पुढील वर्षी आॅक्टोबर महिन्यात देशात १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक रंगणार आहे. मुंबईसह दिल्ली, कोची, गोवा, कोलकाता आणि गुवाहटी या सहा शहरांत विश्वचषकाचे सामने खेळवण्यात येणार आहे. तुर्तास फिफाने या सहा शहरांमधील स्टेडियमवर सामन्यांसाठी होकार दिलेला नाही. पण या शहरातील स्टेडियमची तयारी ही शेवटच्या टप्प्यात आली असून पुढच्या महिन्यात फिफाचे पथक सहा शहरांना ‘ग्रीन कार्ड’ देईल असा विश्वास दास यांनी व्यक्त केला. परिणामी देशातील सहा शहरे फिफाच्या ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहेत.